Asian Games 2018: 2014च्या आशियाई स्पर्धेपेक्षा अधिक पदकं जिंकू - सुमारिवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:55 IST2018-08-28T16:55:05+5:302018-08-28T16:55:26+5:30
Asian Games 2018: अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू 2014च्या तुलनेत अधिक पदक जिंकतील असा विश्वास, भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केला.

Asian Games 2018: 2014च्या आशियाई स्पर्धेपेक्षा अधिक पदकं जिंकू - सुमारिवाला
अभिजित देशमुख (थेट जकार्ताहून)
अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडू 2014च्या तुलनेत अधिक पदक जिंकतील असा विश्वास, भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष व माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारिवाला यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, 'अॅथलेटिक्समध्ये खेळाडू पदकांचा वर्षाव करत आहेत. ट्रॅक आणि फिल्ड दोन्ही प्रकारामध्ये उत्तम कामगिरी होत आहे. ट्रॅक प्रकारात हिमा दास, द्युती चंद यांचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले, त्याची खंत आहे. नीरज चोप्राकडून सुवर्णपदक अपेक्षित होतेच. त्याच बरोबर तेजिंदरपाल सिंगने गोळाफेकत सुवर्ण, नीना वराकीलने लांब उडीत रौप्यपदक जिंकून भारताचा फिल्ड प्रकारात दबदबा दाखवला. अॅथलेटिक्सच्या अजून बऱ्याच स्पर्धा बाकी आहे, त्यामुळे 2014पेक्षा यंदा जास्त पदकं नक्कीच जिंकू.'
ते पुढे म्हणाले,' भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना सरावासाठी खास परदेशात प्राग (चेक रिपब्लिक), थिम्पू (भूतान) येथे पाठवले होते. समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या ठिकाणी सरावाचा फायदा नक्कीच झाला आहे. काही नवीन परदेशी प्रशिक्षकांची नेमणूक केल्याचा फायदा जाणवत आहे. प्रशिक्षक गलीना बुखारींनाचा मार्गदर्शनाखाली हिमा दासने जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. इथेही तिने उत्तम कामगिरी केली. मिश्र रिले स्पर्धेचे मी स्वागत करतो, खेळामध्ये नवीन नियमामुळे उत्सुकता वाढते आणि हे खेळसाठी चांगली बाब आहे. आम्ही २०२० ऑलिम्पिकचा विचार करत आहोत. टोकियो येथे अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकून इतिहास घडला पाहिजे, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.'
2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेची चांगली तयारी झाल्याचे सांगून ते म्हणाले,' 2020ची ऑलिम्पिक स्पर्धा जपानमध्ये होत असल्यामुळे यजमानांची चांगली तयारी झाली आहे. सहाजिकच त्यांची कामगिरी चांगली होत आहे. चीनसुद्धा नेहमीप्रमाणे उत्तम कामगिरी करणार. पण काही मध्यपूर्व आशियाई देश, आफ्रिकी खेळाडूंना काही वर्षातच दुहेरी नागरिकत्व देऊन आशियाई स्पर्धेत खेळवतात. अंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडेरेशनमध्ये हा मुद्दा मांडला आहे, नवीन नियमाप्रमाणे तीन वर्ष देशात राहिल्यानंतरच त्यांना आशियाई क्रीडा किंवा इतर स्पर्धेत मध्यपूर्व आशियाई देशाचे प्रतिनिधित्व करता येणार.'