ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

By Admin | Updated: March 4, 2015 23:59 IST2015-03-04T23:59:44+5:302015-03-04T23:59:44+5:30

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते.

Ashwin tops as compared to Chris Gayle | ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

ख्रिस गेलच्या तुलनेत अश्विन वरचढ

विश्वकप स्पर्धेच्या कार्यक्रमाची ज्या वेळी घोषणा झाली त्या वेळी पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी लढत कठीण असल्याचे मानले जात होते. खेळपट्टीचा इतिहास बघितल्यानंतर ही भीती स्वाभाविक होती, पण त्यानंतर वेस्ट इंडीज संघ मैदानावर संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. आता तर या संघाचा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करावा की नको, असा प्रश्न पडतो. विंडीजने पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि याची मला कल्पना आहे, तरी विंडीजच्या तुलनेत भारत अधिक मजबूत संघ आहे.
तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या तुलनेत विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ वेगळा भासत आहे. धवनला सूर गवसला, हे याचे कारण असू शकते, पण त्यापेक्षा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. गोलंदाजांना मोक्याच्या क्षणी लय सापडली आहे.
यूएईविरुद्धच्या सामन्याच्या निकालावरून आकलन करणे चुकीचे असले, तरी त्या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विंडीजविरुद्धच्या लढतीत उमेश यादव व मोहम्मद शमी सुरुवातीला बळी घेण्यात यशस्वी ठरले, तर विंडीज संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसेल. विंडीज संघाचे तळाचे फलंदाज धोकादायक आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर सिमन्स, सॅमी, रसेल व होल्डर यांना नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर भारतीय संघाचा मार्ग खडतर होणे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ख्रिस गेलला लवकर बाद करणे महत्त्वाचे आहे. या लढतीत भारतीय फिरकीपटूंना लवकर गोलंदाजीची संधी मिळाली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. भारतीय फिरकीपटू येथे कमाल करू शकतात. कारण, अश्विन जबरदस्त फॉर्मात असून, कठीण प्रसंगी गोलंदाजी करणे त्याला आवडते. आयपीएलमध्ये गेलविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
पर्थमध्ये यूएईविरुद्ध खेळणे फायद्याचे ठरले. त्या लढतीत रोहित शर्माला सूर गवसला. रोहितला क्रिकेटजगतात दिग्गज फलंदाज मानले जाते. जर, रोहित लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर विंडीज संघाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडणे निश्चित आहे. कारण विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू आता पूर्वीप्रमाणे दमदार नाही. सॅमी व रसेल यांनाही या संघांत १०-१० षटके गोलंदाजी करावी लागते, यावरून त्याची कल्पना येते. उसळी मिळणाऱ्या खेळपट्टीपासून भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल; पण विंडीज संघाची गोलंदाजी भारतीय संघाची झोप उडवणारी नाही, हे मात्र नक्की.
भारताच्या दृष्टीने विचार करता या सामन्यांचा सर्वोत्तम निकाल म्हणजे विजय असेल. टीम इंडिया या लढतीत गुणांची कमाई करीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक आहे. या लढतीच्या निमित्ताने टीम इंडियाला बाद फेरीची तयारी करण्याची चांगली संधी लाभली आहे. (टीसीएम)

Web Title: Ashwin tops as compared to Chris Gayle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.