अमरावतीच्या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:04 IST2018-11-20T18:03:13+5:302018-11-20T18:04:33+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेत राजकारण : डिसेंबरअखेर होणार होते आयोजन

अमरावतीच्या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविल्या?
अमरावती : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या अमरावतीत होऊ घातलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत पळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने अमरावती ‘ट्रायबल’ने केलेली काहीशी तयारी बारगळली.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मोहिली (अघई) येथे मलिक शैक्षणिक संकुलात १९ ते २१ जानेवारी २०१८ यादरम्यान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. या क्रीडा स्पर्धाच्या समारोपाप्रसंगी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी क्रीडा ध्वज उतरवून अमरावती अपर आयुक्तांकडे देताना पुढील वर्षाच्या क्रीडा स्पर्धांचे यजमानपद अमरावती एटीसी कार्यक्षेत्राकडे सोपविले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत अमरावतीसह नागपूर, ठाणे व नाशिक अपर आयुक्तांनी वेळापत्रकानुसार नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याची तयारी चालविली. दुसरीकडे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त द. कृ. पानमंद यांच्या कार्यालयाने ३१ आॅक्टोबर रोजी ई-मेलद्वारे अमरावतीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजनासंदर्भात तारीख निश्चित करून आवश्यक ती पूर्वतयारी करून आयुक्त कार्यालयांकडे अहवाल सादर करण्यास सांगितले. डिसेंबरअखेर क्रीडा स्पर्धा पार पडतील, याकरिता आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह मंत्र्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे कळविले. मात्र, अमरावती ‘ट्रायबल’ने क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत जोरदार तयारी असताना आता या स्पर्धा गडचिरोली येथे होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त द. कृ. पानमंद यांनी १३ नोव्हेंबर २०१८ रोजी आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धांबाबत अमरावती एटीसीसोबत झालेल्या पत्रव्यवहारदेखील केला. मात्र, आठ दिवसांत नेमके कोणते राजकारण झाले, हे कळलेच नाही. अचानक आता आदिवासी आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन गडचिरोली येथे करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतलेला निर्णय कुणी फिरविला
आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावती अपर आयुक्त कार्यक्षेत्रात होतील, असा निर्णय त्यांनीच घेतला. त्याअनुषंगाने तयारी देखील सुरू झाली. मात्र, आता या क्रीडा स्पर्धा गडचिरोलीत घेण्यामागील कारण काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. ना. विष्णू सावरा यांच्या निर्णयाला कोणी आव्हान दिले, अशी चर्चासुद्धा आदिवासी विकास विभागात रंगू लागली आहे. क्रीडा ध्वज उतरविताना पुढील स्पर्धांचे आयोजन निश्चित केले जाते. त्यानुसार जबाबदार अधिकाऱ्यांकडे हे क्रीडा ध्वज सोपविण्याची परंपरा आहे. अमरावती अपर आयुक्तांकडे क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत ध्वज सोपविले, हे विशेष.
‘‘राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अमरावतीत घेण्याचे यापूर्वी ठरले आहे. त्यानुसार तयारीदेखील करण्यात आली. मात्र, गडचिरोली येथे विभाागाचे स्वतंत्र क्रीडा संकूल असल्यामुळे या स्पर्धा गडचिरोली येथे घेण्यासंदर्भात विचारमंथन सुरू आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही.
- गिरीश सरोदे, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक