अजयने टाळला पुण्याचा पराजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 00:49 IST2016-02-12T00:49:39+5:302016-02-12T00:49:39+5:30
शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या पुणेरी पलटण व पाटना पायरेट्स यांच्यातील रोमहर्षक सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. शेवटच्या क्षणी अजय ठाकूरने २ गडी बाद केल्याने पुण्याचा पराभव टळला.

अजयने टाळला पुण्याचा पराजय
- विशाल शिर्के, पुणे
शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या पुणेरी पलटण व पाटना पायरेट्स यांच्यातील रोमहर्षक सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला. शेवटच्या क्षणी अजय ठाकूरने २ गडी बाद केल्याने पुण्याचा पराभव टळला. पाटनाचा प्रदीप नरवाल याने अफलातून चढाई करीत प्रेक्षकांची मने जिंकली. पुण्याच्या मनजित चिल्लर व जसमिरसिंग गुलिआ यांची खेळी भाव खाऊन गेली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये हा सामना झाला. पाटना पायरेट्सने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत पुणेरी पलटणवर चांगलाच दबाव निर्माण केला. पाटना पायरेट्सच्या प्रदीप नरवालच्या बिनतोड चढाया, त्याला डी. सुरेश कुमार याच्या अष्टपैलू खेळीची मिळालेली साथ यांमुळे पाटना संघाने दहाव्या मिनिटालाच पुण्याचा संपूर्ण संघ बाद करीत लोण चढविला. त्या वेळी पुणे
४-१२ असे मागे होते. पुण्याचे मनजित चिल्लर व अजय ठाकूर यांनी केलेली उत्कृष्ट चढाई व त्याला जसमिरसिंग गुलिआ याच्या जबरदस्त पकडीची साथ मिळाल्याने पुणे संघाने १८व्या मिनिटाला पायरेट्सचा संघ बाद करीत लोण चढविला. तेव्हा पुणे संघाने १३-१६ अशी पिछाडी कमी केली. पूर्वार्ध संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना पाटनाच्या प्रदीप नरवालने ३ गडी बाद करीत सुपर रेड मारली. त्यामुळे पाटनाने २९-१६ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमण व प्रति अक्रमण करीत सामन्यातील चुरस कायम ठेवली. मात्र अगदी ३५व्या मिनिटापर्यंत पाटना संघाकडे २७-२६ अशी निसटती अघाडी होती.
प्रदीपने पुन्हा दोन गडी बाद करीत २९-२७ अशी अघाडी घेतली. त्यानंतर शेवटची दोन मिनिटे शिल्लक असताना पुण्याने २८-३० अशी पिछाडी कमी केली. शेवटच्या मिनिटाला पुण्याच्या अजय ठाकूरने चढाई केला. त्या वेळी पाटनाच्या खेळाडूंनी त्याला मैदानाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांनी दोन्ही संघांतील खेळाडूंना बाद ठरविले. पुणे संघाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यात अजयच्या पारड्यात २ गुण पडले. त्यामुळे पुणे संघाने ३०-३० अशी बरोबरी साधून सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले. दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला.