केकेआरविरुद्ध दिल्लीसाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती

By admin | Published: May 7, 2015 03:48 AM2015-05-07T03:48:58+5:302015-05-07T03:48:58+5:30

घरच्या मैदानावर सलग देखणी कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल-८ मध्ये गुरुवारी दोन हात करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी हा सामना ‘करा किंवा मरा’असाच राहील.

Against KKR, the position of 'tax or die' for Delhi | केकेआरविरुद्ध दिल्लीसाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती

केकेआरविरुद्ध दिल्लीसाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती

Next

कोलकाता : घरच्या मैदानावर सलग देखणी कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल-८ मध्ये गुरुवारी दोन हात करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी हा सामना ‘करा किंवा मरा’असाच राहील.
काल सहावा पराभव पत्करणाऱ्या दिल्लीवर स्पर्धेबाहेर होण्याचे संकट घोंघावत आहे. युवराजसिंग आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी घोर निराशा केली. झहीर जखमांमुळे सुरुवातीचे सामने खेळू शकला नव्हता. आठ गुणांसह सहाव्या स्थानावर असलेल्या दिल्लीला ‘प्लेआॅफ’साठी उर्वरित सर्व चारही सामने जिंकावेच लागतील. दुसरीकडे केकेआर दहा सामन्यांत ११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गंभीरच्या नेतृत्वाखालील या संघाला दिल्लीनंतर १० मे रोजी पंजाबविरुद्ध खेळायचे आहे. हे दोन्ही सामने जिंकून केकेआर सहज पात्रता फेरी गाठू शकतो.
केकेआरने दिल्लीत झालेल्या सामन्यात गंभीरच्या अर्धशतकी खेळीमुळे डेअरडेव्हिल्सचा सहा गडी राखून पराभव केला होता. या संघातील स्टार्स आणि युवा खेळाडूंनी ताकदीने खेळून संघाच्या विजयात योगदान दिले. गोलंदाजीत ब्रॅड हॉग याने सुनील नरेनची उणीव भरून काढली आहे. त्याने चार सामन्यांत आठ गडी बाद केले. गंभीर-रॉबिन उथप्पाच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली; पण मधल्या फळीत मनीष पांडे व सूर्यकुमार यादव यांनी मात्र निराशा केली. गतवर्षी अखेरच्या स्थानावर राहिलेल्या दिल्लीला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. उद्याच्या सामन्यात उभय संघांतील फिरकीपटूंचे युद्ध गाजणार आहे. दिल्लीकडे इम्रान ताहिर आणि अमित मिश्रा हे फिरकीपटू आहेत. युवराजसिंग याने मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक ठोकून फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत. कर्णधार ड्युमिनी आणि श्रेयस अय्यरदेखील फॉर्ममध्ये आहेत; पण पियुष चावला व हॉग यांच्या फसव्या चेंडूंना टोलविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल. उभय संघांत आतापर्यंत १४ सामने खेळले गेले. केकेआरने आठ विजय मिळविले आहेत. गेल्यावर्षी दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकला होता. उभय संघांदरम्यान रात्री ८ वाजल्यापासून सामना खेळला जाईल.(वृत्तसंस्था)

हेड टू हेड
कोलकाता नाईट राइडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये एकूण १५ सामने झाले आहेत. यामध्ये कोलकाताने ८ तर दिल्लीने ६ सामन्यांमध्ये विजय नोंदविला आहे.

कोलकाता नाईट राइडर्स
गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नारायण, उमेश यादव, मोर्नी मोर्कल, रेयॉन टेन डोएशे, अजहर महमूद, योहान बोथा, पॅट कमिन्स, ब्रॉड हॉग, केसी करिअप्पा, आदित्य गढवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमित नरवाल, वीरप्रताप सिंग आणि वैभव रावल.

दिल्ली डेअरडेव्हिल्स
जेपी डुमिनी (कर्णधार), युवराजसिंग, मनोज तिवारी, क्विंटन डिकॉक, इम्रान ताहीर, नाथन कोल्टर नाइल, अँजेलो मॅथ्यूज, गुरिंदर संधू, ट्रेव्हिस हेड, एल्बी मोर्केल, मार्कस स्टोयनिस, केदार जाधव, मयंक अग्रवाल, मोहंमद शमी, अमित मिश्रा, जयदेव उनादकत, झहीर खान, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, श्रेयंस अय्यर, सी. एम. गौतम, श्रीकर भरत, केके जियास, डोमिनिक मुथ्थूस्वामी.

Web Title: Against KKR, the position of 'tax or die' for Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.