आफ्रिका ‘चोकर्स’चा शिक्का पुसणार?

By Admin | Updated: March 17, 2015 23:45 IST2015-03-17T23:45:03+5:302015-03-17T23:45:03+5:30

साखळी फेरीमध्ये चुका सुधारण्याची संधीही होती, पण आता बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या बाद फेरीच्या लढतींमध्ये झालेली चूक अखेरची ठरणार आहे.

Africa's 'Chokers' wipe out the seal? | आफ्रिका ‘चोकर्स’चा शिक्का पुसणार?

आफ्रिका ‘चोकर्स’चा शिक्का पुसणार?

सिडनी : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीअखेर अव्वल आठ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. साखळी फेरीमध्ये चुका सुधारण्याची संधीही होती, पण आता बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या बाद फेरीच्या लढतींमध्ये झालेली चूक अखेरची ठरणार आहे. त्यामुळे आता चुका करण्यास वाव नाही. चूक केली, तर आव्हान संपुष्टात येणार, हे निश्चित. साखळी फेरीत अनेक विक्रमांची नोंद झालेल्या या स्पर्धेत बाद फेरीच्या निमित्ताने आणखी नवे विक्रम नोंदवले जाणार, हे मात्र निश्चित.
प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये ‘चोकर्स’चा लागलेला शिक्का पुसण्यास दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्नशील आहे. या लढतीच्या निमित्ताने दडपणाखाली चमकदार कामगिरी करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज झाला आहे. ‘संगकारा विरुद्ध डिव्हिलियर्स’ असे स्वरूप प्राप्त झालेल्या या लढतीत सरशी कोण साधणार? असा प्रश्न तमाम क्रिकेटचाहत्यांना पडला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजीची भिस्त डिव्हिलियर्स व हाशिम अमला यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे; तर डेल स्टेन गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिका संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, पण प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये हे खेळाडू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरतील का? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंका संघाची बाद फेरीची कामगिरी उल्लेखनीय आहे. गेल्या दोन विश्वकप स्पर्धेत अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव असलेल्या श्रीलंका संघाने टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला आहे. सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा कुमार संगकारा (४९६) सलग चार वन-डे शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने या स्पर्धेत दोन शतके ठोकली आहेत. लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेची गोलंदाजीची बाजू दमदार आहे.
अ‍ॅन्जेलो मॅथ्यूजला एसजीजीवर चाहत्यांचा पाठिंबा मिळण्याचा विश्वास आहे. क्रिकेट जाणकारांनी ‘डिव्हिलियर्स विरुद्ध संगकारा’ असे या लढतीचे चित्र उभे केले आहे. पण, मॅथ्यूजने मात्र ते फेटाळून लावले. मॅथ्यूज म्हणाला, ‘‘खेळ हा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असतो. तुम्ही या लढतीचा अशा पद्धतीने विचार करणे चुकीचे आहे. आम्ही या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक आहोत. ११ व्या क्रमांकावरील खेळाडूने विजय मिळवून दिला तरी आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहे.’’ (वृत्तसंस्था)

च्दक्षिण आफ्रिका संघाला १९९२ येथे नशिबाची साथ लाभली नव्हती. बाद फेरीच्या लढतीत डकवर्थ-लुईस पद्धतीमुळे दक्षिण आफ्रिका संघाला अखेरच्या चेंडूवर २१ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

च्१९९९ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. ‘टाय’ लढतीत आॅस्ट्रेलियाने सरस नेट रनरेटच्या आधारावर अंतिम फेरी गाठली होती.

च्दक्षिण आफ्रिका संघ २००३ च्या कटुस्मृती विसरण्यास प्रयत्नशील आहे. त्या वेळी डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारावर अचूक गणना करण्यात अपयशी ठरल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला डर्बरमध्ये श्रीलंकेविरुद्ध ‘टाय’ झालेल्या लढतीनंतर साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागला होता.

च्२०११ च्या विश्वकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पण, या वेळी मात्र एबी डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ नवा इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत चार वेळा समोसमोर आलेले आहेत.
च्१९९२ : श्रीलंकेने द. आफ्रिकेला पराभूत केले होते.
च्१९९९ : द. आफ्रिकेने ८९ धावांनी विजय मिळविला.
च्२००३ : दोन्ही संघांतील सामना डकवर्थ-लेवीस नियमानुसार बरोबरीत सुटला.
च्२००७ : द. आफ्रिका डकवर्थ-लेवीस नियमानुसार १ गडी राखून विजयी ठरली.
च्दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत ओडीआयमध्ये ५९ सामने झाले आहेत. त्यामध्ये श्रीलंकेने २९ तर आफ्रिकेने २८ वेळा विजय नोंदविला. आहे. एक सामना टाय झाला असून एका लढतीचा निकाल लागू शकला नाही.

अशी असेल खेळपट्टीची स्थिती
येथे हलक्याशा पावसाची शक्यता आहे. परंतु हवामान पूर्णत: कोरडे राहील, अशी अपेक्षा आहे. खेळपट्टी हळहळू संथ होऊन फिरकीला साथ देईल असा अंदाज आहे.

दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला, केली एबोट, फरहान बेहार्डियेन, क्विंटन डिकॉक, जेपी ड्युमिनी, फॅफ ड्यू प्लेसिस, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मोर्नी मोर्कल, व्हेन पार्नेल, अ‍ॅरोन फागिंसो, व्हेर्नोन फिलँडर, रिली रोसोयू, डेल स्टेन.

श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, लाहिरू थिरिमाने, कुशल परेरा, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, नुवान कुलशेखरा, सचित्रा सेनानायके, दुष्मंता चामिरा, उपुल तरंगा, सिकुगे प्रसन्ना, रंगना हेराथ.

06 विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीत दक्षिण आफ्रिका संघ सहा वेळा जाऊन पराभूत झाला आहे. २००० च्या चँपियन्श चषक स्पर्धेत तो उपांत्यफेरीत पोहोचला. अलीकडे २०१३ मध्ये चँपियन चषक स्पर्धेत उपांत्यफेरीत इंग्लंडकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने उपांत्यपूर्व फेरीत त्यांना नमविले होते.

7-6 श्रीलंका आफ्रिकेबरोबर विश्वचषक स्पर्धेपर्यंत एकदिवसीय सामन्यात ७ वेळा जिंकली आहे. तर ६ वेळा हरलेली आहे. लंकेने मायभूमीत ५-३ अशी जिंकण्याची नोंद केली आहे. तर आफ्रिकेने घरच्या मैदानावर ३-२ अशी विजयी कामगिरी नोंदविली आहे. तेरा सामन्यांपैकी आठ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाला संघ जिंकलेला आहे. त्यात दोन्ही संघ चार-चारवेळा प्रथम फलंदाजी करून जिंकलेले आहेत.

3-10 दक्षिण आफ्रिका संघ २५० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करीत असताना १० वेळा पराभूत झालेला आहे. तर २६०, २९९ आणि ३०० पेक्षा अधिक धावांचा त्यांनी यशस्वीरित्या पाठलाग केला. या धावा वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि पाकिस्तान संघांनी अनुक्रमे केल्या होत्या.

बुधवारच्या लढतीत आम्ही चोकर्स ठरणार नाही, याची काळजी घेऊ. आम्ही चांगला खेळ करू आणि विजय मिळवू. आम्हाला केवळ सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
- एबी डिव्हिलियर्स, द. आफ्रिका कर्णधार

सिडनी मैदानावर खेळताना मायदेशात खेळत असल्याचा भास होतो. आॅस्ट्रेलिया व जगातील कानाकोपऱ्यात असलेले अनेक श्रीलंकन चाहते आमचा उत्साह वाढविण्यासाठी बुधवारी सिडनी मैदानावर उपस्थित राहतील. आम्हाला तेथे खेळताना अधिक आनंद मिळतो.
- अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंका कर्णधार

च्या सामन्यातून स्पर्धेतील अधिक धावा करण्याची संधी तिघा फलंदाजांना आहे. त्यात कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि आफ्रिकेचा कर्णधार अ‍ॅबे डिव्हिलिअर्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांतील गोलंदाजांना गडी बाद करण्याच्या पहिल्या पाचमध्ये पोहचता येणार आहे.

Web Title: Africa's 'Chokers' wipe out the seal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.