खेळाडूंना ३८ कोटींचा ‘फटका’
By Admin | Updated: March 4, 2015 02:24 IST2015-03-04T02:24:34+5:302015-03-04T02:24:34+5:30
२०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये सामन्यांच्या प्रसारण हक्क विक्रीमध्ये बीसीसीआयला कमी नफा झाल्याचा परिणाम खेळाडूंच्या मिळकतीवरही होऊन त्यांना ३८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

खेळाडूंना ३८ कोटींचा ‘फटका’
मुंबई : २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये सामन्यांच्या प्रसारण हक्क विक्रीमध्ये बीसीसीआयला कमी नफा झाल्याचा परिणाम खेळाडूंच्या मिळकतीवरही होऊन त्यांना ३८ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या आर्थिक वर्षात ५१६ कोटी रुपये प्रसारण हक्कातून बीसीसीआयला मिळाले होते, तर त्यापूर्वीच्या वर्षी ५५१ कोटी रुपयांची मिळकत झाली होती, अशी माहिती कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी दिली.
चौधरी यांनी सांगितले, की मीडियाचे सर्व हक्क विक्रीतूनही कमी नफा मिळाला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात ७७४ कोटी रुपये यातून मिळाले होते; पण २०१३-१४ वर्षात हा आकडा ४१९ रुपयांवर आला. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघ या वर्षात मायदेशात अतिशय कमी सामने खेळला आहे.
याउलट, आयपीएलमधून मिळणाऱ्या नफ्यात वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये आयपीएलला १,१९४ कोटी रुपये महसूल मिळाला होता. त्याच्या अगोदरच्या वर्षी हाच आकडा ८९२ कोटी रुपये इतका होता.
२०१३-१४ या आर्थिक वर्षात बीसीसीआयने चॅम्पियन्स लीगमधून ३२७ कोटी रुपयांची कमाई केली. बीसीसीआयला आयसीसीकडून ३३ कोटींचा वाटा मिळाला, तर व्याजातून १२० कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
कोची : आयपीएलला अधिक पारदर्शी बनविण्यासाठी संघांच्या ताळेबंदावर बीसीसीआयची करडी नजर असेल, अशी माहिती बीसीसीआयचे नवनियुक्त उपाध्यक्ष आणि आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य टी. सी. मॅथ्यू यांनी सांगितले. एर्नाकुलम प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना मॅथ्यू म्हणाले, ‘‘आयपीएल प्रमोटर्सच्या शेअर्स हस्तांतराच्या प्रक्रियेला सखोल चौकशीनंतरच मंजुरी दिली जाईल. आयपीएल संघावर कोण जास्त गुंतवणूक करीत आहे। त्याचे हस्तांतर कसे झाले आहे? या सर्वांचा विचार केला जाईल. आयपीएलला भ्रष्टाचारमुक्त बनविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
आयपीएलच्या ४ संघांना नोटीस
मुंबई : द. आफ्रिकेत २००९मध्ये झालेल्या दुसऱ्या आयपीएल दरम्यान विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने चार संघांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे़ वृत्तसंस्थेस एका अधिकाऱ्याने सांगितले, की किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांच्या मालकांना नोटिसा जारी करण्यात आल्या़ अधिकाऱ्याने सांगितले, की या संघांनी आपल्या मालकीच्या कंपन्यांमार्फत विदेशात रोख रकमेच्या हस्तांतरामध्ये आरबीआयच्या नियमांचे उल्लघन केल्याने सदर नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.(वृत्तसंस्था)
श्रीसंतची मदत करू
जर न्यायालयाने श्रीसंतला स्पॉटफिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्त केले, तर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी त्याला आम्ही पूर्णपणे मदत करू. मी कालच श्रीसंतशी बोललो आहे. त्याला मी पूर्ण सहकार्य करीन.
-टी. सी. मॅथ्यू