राष्ट्रकुलमध्ये ३२ वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण
By Admin | Updated: August 3, 2014 18:44 IST2014-08-03T18:44:10+5:302014-08-03T18:44:10+5:30
राष्ट्रकुलस्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पी. कश्यपने तब्बल ३२ वर्षांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.कश्यपने सिंगापूरच्ये डेरेक वोंगचा २१-१४, ११-२१, २१-१९ ने पराभव केला.
राष्ट्रकुलमध्ये ३२ वर्षानंतर बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण
ऑनलाइन टीम
ग्लास्गो, दि. ३ - राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पी. कश्यपने तब्बल ३२ वर्षांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तर हॉकीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४- ० ने मात करुन सुवर्ण पदकावर नाव कोरले. हॉकीमध्ये भारताला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत रविवारी पी. कश्यपचा सामना सिंगापूरच्या डेरेक वोंगशी झाला. गेल्या वर्षी राष्ट्रकुलमध्ये कांस्यपदक मिळवणारा कश्यप यंदा सुवर्ण पदकावर नाव कोरतो का याकडे सर्वांचे लक्ष होते. कश्यपनेही सुरुवातीपासूनच चांगला खेळ करुन पहिला सेट जिंकला. दुस-या सेटमध्ये वोंगने पुनरागमन केले व दुस-या सेटमध्ये विजय मिळवून त्याने कश्यपची बरोबरी केली. शेवटच्या सेटमध्ये कश्यपने वोंगला संधीच दिली नाही व तिसरा सेट जिंकून बॅडमिंटन एकेरीच्या पुरुष गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. बॅडमिंटन एकेरीमध्ये पुरुष गटात भारताला तब्बल ३२ वर्षांनी सुवर्णपदक मिळाले आहे.
यापूर्वी १९७८ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी तर १९८२ मध्ये सय्यद मोदी यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
हॉकीमध्ये सुवर्ण पदकासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. मात्र संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना आघाडी घेण्याची संधीच दिली नाही. मध्यंतरापूर्वी ऑस्ट्रेलियाने २- ० अशी विजयी आघाडी घेतली. मध्यंतरानंतरही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला रोखता आले नाही व या सामन्यात भारताचा ४ -० असा दारुण पराभव झाला. हॉकीमध्ये पुन्हा एकदा भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गेल्या राष्ट्रकुलमध्येही ऑस्ट्रेलियाने भारतावरच मात करुन सुवर्णपदक मिळवले होते.