तरुणीची फसवणूक करणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 02:27 IST2019-07-31T02:27:27+5:302019-07-31T02:27:40+5:30
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

तरुणीची फसवणूक करणाऱ्याला अटक
नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करणाºयाला ओडिसामधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याचा शोध घेऊन अटक केली.
कुंजबिहारी मेहेर (३४) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा ओडिसाचा असून कोपरखैरणे सेक्टर ८ येथे राहायला होता. रियल इस्टेटच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याची सेक्टर १९ परिसरातील एका तरुणीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्याने सदर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले होते. या दरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र, तरुणीने लग्नाचा तगादा लावला असता, त्याने तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे तरुणीने मेहेर याच्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, गुन्हा दाखल होताच त्याने राज्याबाहेर पळ काढला होता. यामुळे त्याच्या शोधाकरिता सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, हवालदार जयराम पवार व अमोल भसरा यांचे पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान त्यांना मेहेर हा ओडिसा येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार देवडे यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन मेहेर याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून नवी मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.