शहरवासीयांना ‘योगमंत्र’
By Admin | Updated: June 22, 2016 02:19 IST2016-06-22T02:19:34+5:302016-06-22T02:19:34+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना आरोग्याचा कानमंत्र देण्यासाठी मंगळवारी विविध स्तरांवर योगपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

शहरवासीयांना ‘योगमंत्र’
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना आरोग्याचा कानमंत्र देण्यासाठी मंगळवारी विविध स्तरांवर योगपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे यंदाच्या योगदिनाचे वैशिष्ट्य ठरले. सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा विविध माध्यमातून समाजात योगविद्येविषयी जनजागृती करण्यात आली.
वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या योग शिबिराच्या पहिल्या सत्रात योगासनांबरोबरच प्राणायामाचाही अभ्यास करण्यात आला. योग शिबिराच्या दुसऱ्या सत्रात शहरातील १० पेक्षा अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी योगविद्येचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी माहिती कृष्ण कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिली. शिस्तबध्द पध्दतीत विद्यार्थ्यांनी या संपूर्ण योगसत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वाशीतील फादर एग्नल शाळा, साईनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, आयसीएल शाळा, आयईएस शाळा, रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, सेंट लॉरेन्स, टिळक स्कूल, जयपुरीयार स्कूल तसेच खारघर, बेलापूर आदी विभागातील शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, अर्धभुजंगासन, पादहस्तासन, त्रिकोणासन आदी योगासने शिकविण्यात आली. या योग शिबिरात डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीने मोफत दंतचिकित्सा शिबिर राबविण्यात आले. आजचे तरुण उद्याचे भविष्य ठरणार असून या तरुणांना नियमित योगसाधना करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. आर्ट आॅफ लिव्हिंगचे कृष्ण कुमार यांना योगाभ्यास हीच जगण्याची खरी कला असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल, द आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेचे प्रशिक्षक सौरव घोष, संदीप महाजन, रत्नेश्वर शेट्ये, प्रमोद कोकणे, दीपक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
पतंजली योग समितीमार्फत नवी मुंबई महानगरपाविका शाळेतील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आल.े वाशीतील शाळा क्र. २८ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्व मनपा शाळांमध्ये योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, शिक्षण विभागाचे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शिक्षणाधिकारी रुचिका संख्ये, योगेश हन्नुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.