उरण : जेएनपीटीच्या प्लाझा पार्किंगच्या बाजूला बंदराकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरने रिक्षाला धडक दिली. अपघातात कामगार भरत ठाकूर (५२) याचा मृत्यू झाला, तर सहकारी सचिन म्हात्रे हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर चालकाने पळ काढला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह नातेवाइकांनी जेएनपीए मार्गावर रास्ता रोको केला. जेएनपीए अंतर्गत असलेल्या एका खासगी बंदरात भरत ठाकूर (रा. केळवणे-पनवेल) हा डीपीडी विभागात काम करीत होता. मंगळवारी रात्रपाळी करून भरत ठाकूर आणि त्याचा सहकारी सचिन म्हात्रे (४२, रा. चिरनेर) हे दोघे रिक्षाने घरी जात होते. जेएनपीटीच्या प्लाझा पार्किंगच्या बाजूला बंदराकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रेलर चालकाने रिक्षाला धडक दिली. याप्रकरणी ट्रेलर चालक अमजद खान (४२) याच्यावर गुन्हा दाखल केला.अपघाताची माहिती मिळताच पनवेलचे एसीपी अशोक राजपूत, न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या नातेवाइक, ग्रामस्थही घटनास्थळी येऊन धडकले. आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.
ट्रेलरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू; नातेवाईकांचा ‘जेएनपीए’वर रास्ता रोको; अडीच तास वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:51 IST