काठेवाडीत श्रमदानातून तलावाचे काम

By Admin | Updated: May 30, 2017 06:17 IST2017-05-30T06:17:06+5:302017-05-30T06:17:06+5:30

कर्जतमधील आदिवासीबहुल विभाग असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील काठेवाडी ही भीमाशंकर अभयारण्याच्या

Work of pond work in Katheewadi in Kathewadi | काठेवाडीत श्रमदानातून तलावाचे काम

काठेवाडीत श्रमदानातून तलावाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ/कर्जत : कर्जतमधील आदिवासीबहुल विभाग असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील काठेवाडी ही भीमाशंकर अभयारण्याच्या अगदी पायथ्याशी तीनशेच्यावर लोकसंख्या असलेली आदिवासीवाडी आहे. काठेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष दरवर्षी जाणवत असते. त्या ठिकाणी विहिरीमधील पाण्याचे नियोजन येथील ग्रामस्थांनी केल्याने पिण्याचे पाणी जवळ उपलब्ध आहे, मात्र धुणीभांडी करायचे पाणी येथील ग्रामस्थांना खांडस पाझर तलाव येथून आणावे लागत आहे, त्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ही पायपीट थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून सर्व श्रमदानातून विहीर खोदत आहेत.
भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी आजूबाजूला उंचसखल भाग असल्याने काठेवाडीमध्ये पिण्याचे पाणी तेथील नाल्यात असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात थांबत नाही. खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काठेवाडीमध्ये असलेल्या ६० घरांच्या लोकवस्तीसाठी शासनाने तीन विहिरी खोदल्या आहेत. त्या विहिरी उन्हाळ्यात तळ गाठत असल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाण्याचे नियोजन करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केल्याने आज या परिसरात मोठी पाणीटंचाई आहे. मात्र काठेवाडी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी फार लांब जावे लागत नाही. कारण गावाच्या आजूबाजूला असलेल्या तीन विहिरींपैकी जी विहीर आधी तळ गाठते याची माहिती ग्रामस्थांनी घेऊन त्या विहिरीमधील पाणी आधी पिण्यासाठी घेण्याचे नियोजन केले. प्रत्येक घरटी चार हंडे पाणी देण्याचे नियोजन करून रात्री पाणी कोणी चोरणार नाही याची काळजी ग्रामस्थ घेत असतात.
आज काठेवाडीमधील तीन विहिरींपैकी दोन विहिरींनी तळ गाठला असून फक्त एका विहिरीत पाणी उपलब्ध आहे. त्या विहिरीतील पाणी ग्रामस्थ प्रत्येक घरटी चार हंडे असे दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्याने महिलांची वणवण थांबली आहे. मात्र त्याच महिलांना धुणीभांडी करण्यासाठी लागणारे पाणी तीन कि. मी अंतरावरील खांडस पाझर तलावातून आणावे लागत आहे.

या तलावाला बाळू उगले, बबन ऐनकर, कैलाश जडर यांनी स्वत:ची जागा दिल्यामुळे येथे २५ ते ४० मीटर क्षेत्रामध्ये खोदकाम सुरू असून तलावाचे काम ३० फूट खोल झाले आहे. तसेच या तलावासाठी पुणे येथील साबळे महाराज यांनी वैयक्तिक निधी दिला असून ग्रामस्थांनी वर्गणी गोळा के ली आहे. गेल्या दोन महिन्यापासून गावातील पुरु ष-महिला आणि तरु ण-तरु णी श्रमदान करीत आहेत. पावसाळा जवळ आल्याने पुढील वर्षी या तलावाची खोली वाढवून ती ५० फूट खोल करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाताना राजेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून स्वखर्चाने या वाडीला पाण्याचे टँकर दिले जातात, असे माजी उपसरपंच संतोष काठे, बाळू पारधी, बालू उगले, सुनील उगले यांनी सांगितले.

आमच्या येथे असलेल्या सर्व तिन्ही विहिरींमध्ये पाण्याचे नियोजन आम्ही ग्रामस्थ करीत असल्याने पिण्याचे पाणी काही प्रमाणात मिळते. मात्र ते अपुरे असल्याने सातत्याने पाठपुरावा केल्याने आणखी एक विहीर मंजूर झाली आहे. ही विहीर मोठ्या आकाराची असल्याने खोदकाम पूर्ण झाल्यानंतर पुरेसा पाणीसाठा निर्माण झाल्यास ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट थांबेल. त्यासाठी नवीन विहीर आम्ही ग्रामस्थ श्रमदान करून बांधत आहोत.
-भाई काठे, माजी उपसरपंच
या तलावाच्या कामाने महिलांना ३-४ किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी होणारा त्रास थांबला असून पुढे तलावापासून वाडीपर्यंत पाइपलाइन टाकून गावात ५००० लिटर्सची टाकी ठेवण्याचा मानस आहे. यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय गावातच होणार आहे.
- राजेश गायकवाड, सचिव, जीवन ज्योत सामाजिक संस्था

Web Title: Work of pond work in Katheewadi in Kathewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.