महापालिकेच्या तिजोरीची चावी येणार पुन्हा महिलेच्या हाती
By Admin | Updated: May 23, 2017 02:16 IST2017-05-23T02:16:53+5:302017-05-23T02:16:53+5:30
महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

महापालिकेच्या तिजोरीची चावी येणार पुन्हा महिलेच्या हाती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने शुभांगी पाटील व शिवसेनेने ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी निवडणूक होणार असून तिजोरीच्या चाव्या दुसऱ्यांदा महिलेच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मतदानाचा हक्क नाकारल्याने व काँगे्रसने बंडखोरी केल्याने शिवसेनेने सभापतीपद मिळविले होते. परंतु यावेळी अंतर्गत वादामुळे शिवसेनेने नवख्या सदस्याला संधी देवून अप्रत्यक्षपणे हार मानली असल्याचे बोलले जात आहे.
एक महिन्यापासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी व शिवसेनेच्यावतीने कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेमध्ये सदस्य निवडीवरून प्रचंड मतभेद झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह इतर सदस्यांच्या यादीला विजय नाहटा यांच्या गटाने जोरदार आक्षेप घेतले. नवीन नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी एक गटाने बेलापूरचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांच्याकडे राजीनामे दिले होते. यामुळे शेवटच्या क्षणी दोन नवीन सदस्यांना संधी देण्यात आली.
पक्षातील भांडणामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केले. काँगे्रसनेही सहकार्य करण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने नवख्या ऋचा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेमधील भांडणामुळे राष्ट्रवादी काँगे्रसनेही बघ्याची भूमिका घेतली होती. सेनेची यादी निश्चित झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांची यादी जाहीर केली.
सभापतीपदासाठी सुरेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असताना शेवटच्या क्षणी तुर्भेमधील नगरसेविका शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसने दुसऱ्यांदा निवडून आलेल्या व स्थायी समितीचा अनुभव असलेल्या नगरसेविकेला संधी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपाने नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. गतवेळी काँगे्रसने बंडखोरी करून युतीला साथ दिली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या सदस्यांना आघाडी धर्म पाळण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्यावतीने काँगे्रसचे मत वळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नसल्याने शेवटच्या क्षणी ऋचा पाटीलला उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी दुपारी तीन वाजता निवडणूक होणार असून काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.