एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 05:33 IST2025-09-17T05:30:01+5:302025-09-17T05:33:04+5:30
बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते.

एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
नवी मुंबई : स्वत:च्या तुंबड्या भरणारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. आमच्या नेत्यावर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा नरेश म्हस्के यांनी नाव न घेता वनमंत्री गणेश नाईक यांना दिला. महापालिकेची निवडणूक सन्मानाची असून, महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते. नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात असल्याने कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे, हा संदेश देण्यासाठीच आल्याचे त्यांनी सांगितले.
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
महायुतीत निवडणूक लढवण्याची आमची इच्छा
महायुती म्हणून निवडणुका लढण्याची इच्छा आहे. भाजप व आमच्यामध्ये काहीही दुरावा नाही. येथे भाजपमध्येच अंतर्गत दुरावा आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यात सत्ता आली व पुन्हा निवडणुकीतही सत्ता मिळाली. नाहीतर, काही जण जंगलात जाऊन बसले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांविषयी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात आल्याचेही नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.
आपली कामे जनतेपर्यंत पाेहाेचवण्याचे आवाहन
टीका करणारांनी थोडा वेळ नवी मुंबईच्या विकासासाठी दिला असता तर बरे झाले असते. आमच्या नेत्यांनी स्वत:च्या घराण्याचा विचार न करता संपूर्ण नवी मुंबईचा विचार करून निर्णय घेतला आहे. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपनेते विजय नाहटा, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, सुरेश कुलकर्णी, अविनाश लाड, अशोक गावडे, विजय माने, वैभव गायकवाड, सरोज पाटील, सुशील यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.