पनवेलमधील बेवारस वाहनांचा मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 02:46 AM2021-03-07T02:46:31+5:302021-03-07T02:47:17+5:30

पालिकेची कारवाई थंडावली : वाहतुकीला होतो मोठा अडथळा

Who owns the unattended vehicles in Panvel? | पनवेलमधील बेवारस वाहनांचा मालक कोण?

पनवेलमधील बेवारस वाहनांचा मालक कोण?

googlenewsNext

वैभव गायकर
पनवेल : शहरात मागील वर्षभरापासून कोरोनामुळे बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाईत थंडावली आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर विद्रुप होत चालले आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांकडून या  वाहनांची तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली जाते. मात्र, वाहतूक पोलीस संबंधित जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगतात. 
कोरोनापूर्वी पालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम अतिशय वेगवान केली होती. २४ तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना पालिकेमार्फत नोटीस दिली जात होती. तरीही वाहने न हटविल्यास पालिकेकडून संबंधितांना दंड आकारला जात होता. मात्र, पुन्हा एकदा बेवारस वाहनांचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कोरोनापूर्वी पालिकेने १९७ वाहने जप्त केली होती. यामध्ये ९९ दुचाकी, १४ तीनचाकी व ८४ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. कोरोनामुळे पालिकेची बेवारस वाहनांविरोधात कारवाईची मोहीम थंडावली आहे. 

अशा वाहनांमुळे अस्वच्छता 
बहुतांश चौकात अशा प्रकारची बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. 

पालिकेकडून मध्यंतरी बेवारस वाहनांवर स्टिकर लावून कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, पुढे त्या वाहनांवर कोणतीच कारवाई झाली नाही. कारवाई केली जात नसल्याने सर्वत्र रस्त्याच्या कडेला बेवारस वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.
- बिना गोगरी,
रहिवासी, खारघर सेक्टर १९

कोरोना काळात बेवारस वाहनांवर कारवाई थांबली होती. तत्पूर्वी पालिकेमार्फत १९७ विविध प्रकारची बेवारस वाहने जप्त करण्यात आली? आहेत. सोमवारपासून नव्याने बेवारस वाहनांविरोधात कारवाईची मोहीम पालिका क्षेत्रात राबविणार आहोत. 
- सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका 

अनेक वेळा ही वाहने कोणाची आहेत ? ती मोकळ्या जागेवर कशी आली? याविषयी रहिवाशांना काहीच माहीत नसते.  याबाबत पालिकेने कारवाईची गरज आहे. 
- मनेश माने, रहिवासी, पनवेल

अनेक महिने ही वाहने एकाच जागेवर असतात. पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, कारवाई केल्यावर त्या वाहनांचे मालक आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार ? असे उत्तर  पालिकेचे काही कर्मचारी देतात. 
- रामचंद्र देवरे, रहिवासी, खारघर सेक्टर ८

बेवारस वाहने पालिकेने जप्त करून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. बहुतांश वेळेला अनेक गाडी मालक आपली वाहने रस्त्यावर टाकून जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असतो. संबंधित वाहनांना कोण वालीच नसेल तर पालिकेने त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. 
- आनंद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक शाखा

 

Web Title: Who owns the unattended vehicles in Panvel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.