महापालिके वर कोणाचा झेंडा?

By Admin | Updated: May 25, 2017 00:29 IST2017-05-25T00:29:35+5:302017-05-25T00:29:35+5:30

पनवेल महानगरपालिकेसाठी २४ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत देखील ठाकूर विरुद्ध पाटील

Who is the flag of the municipality? | महापालिके वर कोणाचा झेंडा?

महापालिके वर कोणाचा झेंडा?

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेसाठी २४ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत देखील ठाकूर विरुद्ध पाटील असेच युद्ध पाहावयास मिळाले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पहिल्या व महाराष्ट्रातील २७ व्या पनवेल महापालिकेवर कोणाची सत्ता येते हे शुक्रवारी २६ मे रोजी ठरणार आहे. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना देखील या निवडणुकीत करो या मरोची स्थिती आहे, तर शेकापला देखील सत्ता मिळवणे गरजेचे आहे. शिवसेनेने देखील भाजपाला साथ न देता वेगळा संसार मांडल्याने साऱ्याच पक्षांनी ही पालिकेची पहिली निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे साऱ्यांचेच पनवेलच्या राजकारणाकडे लक्ष लागून राहिले आहे.
पनवेलमध्ये पुन्हा एकदा रामशेठ ठाकूर विरु द्ध विवेक पाटील अशी लढाई पाहावयास मिळत आहे. उमेदवारांच्या सभेत दिग्गजांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात होत्या. मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार व कोणत्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागेल हे २६ मे रोजी ठरेल. पनवेलच्या राजकारणात रामशेठ ठाकूर व विवेक पाटील यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा -आरपीआय यांची युती, शेकाप-काँग्रेस- राष्ट्रवादी यांची महायुती, तर शिवसेना -स्वाभिमानी यांची युती व मनसे यांच्यात पनवेल महापालिकेसाठी निवडणूक होत आहे. भाजपा-शेकाप व शिवसेना हे पक्ष सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र मतदार कोणाला साथ देतात व कोणाला नाकारतात हे लवकरच समजणार आहे. भाजपा, शेकाप व शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. पनवेलची निवडणूक ही रामशेठ ठाकूर विरु द्ध विवेक पाटील अशी लढाई आहे. यासाठी शेकाप आघाडीने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दिग्गजांना प्रचारासाठी मैदानात आणले होते.
तर यावेळी महापालिकेवर सत्ता आली तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्री करणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पनवेलमधील जाहीर सभेत के ले होते. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सभेसाठी पाचारण करून भगवे वातावरण करण्याचा प्रयत्न केला. तर मनसेने बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांच्यावर मदार सोपवली होती. त्यामुळे या निवडणुकीत मतदारराजा कोणाला आपला कौल देतो हे येणाऱ्या २६ तारखेलाच स्पष्ट होईल.
निवडणुकीच्या कालखंडात काही ठिकाणी गालबोट देखील लागले. काही उमेदवारांवर मारामारीचे तर काहींवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील व शिवसेनेचे संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांनी स्वत: प्रचारात उडी घेतली होती. त्यामुळे या पहिल्या वहिल्या पनवेल महापालिके वर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Web Title: Who is the flag of the municipality?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.