कारचा दंड तपासायला गेला अन् वाहनचोर लागला गळाला; ट्रॅफिक पोलिस ॲपमुळे वाहनचोरीचा गुन्हा उघड 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 15, 2025 06:22 IST2025-05-15T06:22:06+5:302025-05-15T06:22:41+5:30

वाहनचोरांसोबत त्या पोलिस उपनिरीक्षकाच्याही मागे नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. 

went to check car fine and found car thief | कारचा दंड तपासायला गेला अन् वाहनचोर लागला गळाला; ट्रॅफिक पोलिस ॲपमुळे वाहनचोरीचा गुन्हा उघड 

कारचा दंड तपासायला गेला अन् वाहनचोर लागला गळाला; ट्रॅफिक पोलिस ॲपमुळे वाहनचोरीचा गुन्हा उघड 

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : चोरीची कार विकताना त्यावर दंड आहे की नाही, हे चोरट्याने तपासल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने कारचा चेसिस नंबर  वाहतूक पोलिसांच्या ॲपवर नोंदवताच तत्काळ त्याची माहिती गाडीच्या मूळ मालकाला मिळाली. यामुळे घणसोलीतून चोरीला गेलेली कार अहिल्यानगरमध्ये आढळली. चोरीची ही कार तिथल्या पोलिस उपनिरीक्षकाने खरेदी केली होती. यामुळे वाहनचोरांसोबत त्या पोलिस उपनिरीक्षकाच्याही मागे नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. 

नवी मुंबईतील वाहनचोरीचे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस यांनी अनेक टोळ्या काही महिन्यांत जेरबंद केल्या आहेत. त्यामुळे कार चोरी काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरीही दुचाकी चोरीचे प्रमाण मात्र नियंत्रणाबाहेरच आहे. अशातच नवी मुंबईतून चोरलेल्या कार अहिल्यानगर परिसरात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. वाहनचोरांची ही साखळी उघड होण्यास साखळीतीलच एकाचे एक पाऊल पोलिसांच्या पथ्यावर पडले.

घणसोली गावातून फेब्रुवारीत कार चोरीला गेली होती. दोन महिन्यांत या कारचा ताबा दोघांकडे गेला होता. त्यापैकी अहिल्यानगर येथील वाहन दुरुस्ती करणाऱ्याने ही कार पुढे तिथल्याच पोलिस उपनिरीक्षकाला विकली. मात्र, कार विकल्यानंतर त्याने सहजच विकलेल्या कारचा चेसिस नंबर ट्रॅफिक पोलिसांच्या ॲपवर टाकून तिच्यावर दंड आहे का? ही कार कोणाच्या नावावर नोंद आहे? हे तपासण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या व्यक्तीचा मोबाइल नंबर थेट गाडीच्या मूळ मालकाच्या मोबाइलवर आला. याबाबत त्यांनी रबाळे पोलिसांना कळवल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी अहिल्यानगरकडे पथक रवाना केले. 

तपास पथकाने रातोरात त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याने ज्या पोलिस उपनिरीक्षकाला कार विकली होती त्याच्या दारातून कारचा ताबा घेतला. ही कार चोरीची असल्याचे आपल्याला माहिती नव्हते, असे त्या उपनिरीक्षकाने सांगितले असले, तरीही कागदपत्रांची पडताळणी न करता ती खरेदी केल्याने हे पोलिस अधिकारीही संशयाच्या फेऱ्यात आले आहेत. 

ॲपवर नोंदणी करणे मूळ मालकाला ठरले फायदेशीर 

ट्रॅफिक पोलिस ॲपवर कारवरील दंड तपासल्याने वाहनचोर हाती लागल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. कारमालकाने त्यांच्या गाडीची ट्रॅफिक पोलिस ॲपवर आधीच नोंदणी केली होती. त्यामुळे चोरट्यांनी पुन्हा त्याच गाडीचा चेसिस नंबर नोंद केल्याने गाडीच्या मूळ मालकाला त्याची माहिती कळवली गेली आणि संपूर्ण प्रकार उघड झाला. 

या गुन्ह्यात अद्यापपर्यंत मोहम्मद हुसेन जुहूर शेख (६३), शाहरूख असलम शेख (३०), सैफअली नासिर खान (३०) यांना मुकुंदनगर परिसरातून अटक केली आहे. त्यांचे नवी मुंबई, ठाणे परिसरात पसरलेले हातदेखील पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

 

Web Title: went to check car fine and found car thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.