पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट
By Admin | Updated: January 4, 2016 02:10 IST2016-01-04T02:10:43+5:302016-01-04T02:10:43+5:30
जलसाठ्यांची पातळी खालावल्याने सर्वत्र पाणीकपात करण्यात आली आहे. नवी मुंबईत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात पाणीकपात घोषित केली आहे

पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट
पनवेल : जलसाठ्यांची पातळी खालावल्याने सर्वत्र पाणीकपात करण्यात आली आहे. नवी मुंबईत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात पाणीकपात घोषित केली आहे. पनवेल नगरपालिका देखील लवकरच पाणीकपात करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरु वातीलाच पनवेलकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे राहाणार आहे .
पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे असलेल्या देहरंग धरणातून पनवेल, नवीन पनवेल शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. दिवसाला २७ एमएलडीहून अधिक पाणी देहरंग धरण, एमजेपी आणि एमआयडीसीकडून पनवेल शहराला पुरवले जाते. या जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र पावसाळ्यात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. परिणामी धरणाची पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. शहराला सुमारे २७ एमएलडी पाण्याची गरज असून, ९ ते १० एमएलडी देहरंग धरणातून मार्चपर्यंत मिळते. उर्वरित पाणी एमजेपी व एमआयडीकडून विकत घेण्यात येते.
गाढेश्वर धरणाची नगर परिषदेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून, त्यातील १२५ क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. नगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमिनीला अद्याप संरक्षक भिंतदेखील बांधली नाही. तसेच अर्ध्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही.
पूर्वी धरणाची साठवणूक क्षमता जास्त होती. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे माथेरानच्या डोंगरावरील माती वाहत येऊन ती गाढेश्वर धरणात जमा झाली. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला. पनवेल शहराची पाण्याची गरज दुप्पट , ती भागवण्यासाठी नगरपालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोवर अवलंबून राहावे लागते. नव वर्षात पाणीकपातीचे संकेत मिळाले आहेत. मात्र नेमकी किती टक्के पाणीकपात करायची, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. (प्रतिनिधी)