Waiting for the bonus to the cleaning staff | सफाई कर्मचाऱ्यांना बोनसची प्रतीक्षा
सफाई कर्मचाऱ्यांना बोनसची प्रतीक्षा

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचा ठेका चालविणाऱ्या साई गणेश इंटरप्रायझेस या ठेकेदाराला पालिकेचे सहायक उपायुक्त श्याम पोशेट्टी यांनी नोटीस बजावली आहे. सफाई कामगारांना देण्यात येणाºया सुविधा तसेच दिवाळी बोनस संदर्भात पूर्तता करण्याच्या दृष्टीने सहायक उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली तरीदेखील सफाई कर्मचाऱ्यांना बोनस मिळालेला नाही.

आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी यासंदर्भात कामगार उपायुक्तांना पत्र लिहून कामगारांना २१ पगारी सुट्टी, मागील वर्षीच्या २१ पगारी सुट्टींचे पैसे, गमबुट, गणवेश, साबण आदी मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने कामगारांना सुविधा पुरविण्याची विनंती केली होती. त्या पत्राच्या आधारे कामगार उपायुक्तांनी २६ सप्टेंबर रोजी पालिकेला पत्र लिहून कामगारांच्या विविध मागण्या सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या. या पत्राची दखल घेत पालिकेचे सहायक उपायुक्त श्याम पोशेट्टी यांनी ठेकेदार साई गणेश इन्टरप्रायझेसला नोटीस बजावत वरील मागण्यांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मात्र, अद्याप कामगारांना बोनसही अद्याप प्राप्त झालेला नाही. यामध्ये घंटागाडी आणि सफाई कर्मचाºयांचा समावेश आहे. पालिकेने त्वरित कामगारांना बोनस देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, तसेच गमबुट व गणवेश लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी आझाद कामगार संघटनेचे महादेव वाघमारे यांनी केली.


Web Title: Waiting for the bonus to the cleaning staff
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.