भिवंडी, पनवेल आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात
By Admin | Updated: May 24, 2017 10:07 IST2017-05-24T09:44:33+5:302017-05-24T10:07:13+5:30
मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिका आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे

भिवंडी, पनवेल आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिका आणि मालेगावमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून, रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पनवेलमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भिवंडीत मतदानाच्या बंदोबस्तासाठी जवळपास अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदानाची व्यवस्था पाहत आहेत. श्रीराम हिन्दी हायस्कुल व रईस हायस्कुल मध्े मतदारांचे रांगोळीद्वारे स्वागत करण्यात येत आहे.
भिवंडीच्या २३ प्रभागांतील ९० जागांसाठी होत असलेल्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवून प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे; पण काँग्रेस, शिवसेना, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पक्षांचे विविध गट यामुळे निवडणूक बहुरंगी ठरली आहे. भिवंडीत चार लाख ७९ हजार २५३ मतदार आहेत. त्यात दोन लाख ९१ हजार ९९१ पुरुष आणि एक लाख ८७ हजार २६० महिला आहेत. तृतीयपंथी मतदार दोन आहेत. ६३७ बुथ तयार करण्यात आले आहेत.
शुक्रवारी मतमोजणी
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध ७ नगर परिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महापालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार ०२६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे देण्यात आली आहेत. त्यात २ हजार २९१ कंट्रोल युनिट; तर ७ हजार १४३ बॅलेट युनिटचा समावेश आहे.