कोपरखैरणेत ‘एक गाव एक होळी’; आगरी कोळ्यांची हावलूबाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:27 IST2020-03-08T23:27:20+5:302020-03-08T23:27:33+5:30

आगरी-कोळी समाज बांधवांचा पारंपरिक उत्सव

'A village a Holi' in the corner; Agave spider hawlaby | कोपरखैरणेत ‘एक गाव एक होळी’; आगरी कोळ्यांची हावलूबाय

कोपरखैरणेत ‘एक गाव एक होळी’; आगरी कोळ्यांची हावलूबाय

अनंत पाटील

नवी मुंबई : जायफल टेंगता उन्गवला दवणा, दवणा नाय गो दवण्याची कारी... हे गीत कानावर पडले की, समजायचे आगरी-कोळी बांधवांची होळीची लगबग सुरू झाली. होळी म्हणजे होलिकोत्सव. आगरी-कोळी समाज हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. सध्या शहरात या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

आगरी कोळी बांधव सर्व सणांप्रमाणे होळी हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. अशी माहिती दिवा कोळीवाडा येथील नाट्यकर्मी यशवंत दिवेकर यांनी दिली. कोळी भाषेत सांगायचे झाले तर होळी म्हणजे हावलूबायचा सण आणि रंगपंचमी म्हणजे शिमगा म्हणून ओळखला जातो.

जावईबापूंचा सन्मान
कोपरखैरणे गावात एक गाव एक होळी ही या गावची अनेक वर्षांची होळीची परंपरा आहे. या सणाला गावात होळीच्या आधी ज्या मुलींची नवीन लग्ने झाली असतील त्या नव दाम्पत्याला मान देत जावई बापूंचा जाहीर सत्कार केला जातो. होळी पेटविल्यानंतर सर्वप्रथम हे जोडपे प्रदक्षिणा घालते आणि मग गावकरी कुटुंबासह होळीला नारळ आणि ऊस वाहतात. होळीच्या राखेचा टिळा लावल्यानंतर सर्व जण घरचा रस्ता पकडतात, अशी माहिती कोपरखैरणे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सुतार यांनी दिली.

होळी आणि शिमग्याचा लग्नसोहळा
दिवा कोळीवाडा येथे शिमग्याच्या सणाची सोंगे काढण्याची लगबग सुरू झाली आहे. घणसोली गावात महिलांनी ‘दवणा नाय गो दवण्याची कारी...’ या होळी नृत्याची तयारी केली आहे. तर ऐरोली कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी होळी आणि शिमग्याच्या लग्नाची तयारी केली असून लग्नपत्रिकाही घरोघरी वाटप केल्या आहेत. रविवारी ८ मार्च रोजी रात्री ११.५५ वाजताच्या सुमारास एकवीरा चौक, ऐरोली कोळीवाडा येथे होळी आणि शिमग्याचा लग्नसोहळा पार पडला.

होड्यांची, बोटींची पूजा
दिवाळीप्रमाणेच होळी हा दुसरा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत कोळीबांधव आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या होड्यांची पूजा करतो. तिची रंगरंगोटी करून तिला नववधूप्रमाणे सजवले जाते. सायंकाळी कोळीबांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या ठेक्यावर होळीभोवती नाचतात. हा सण नवविवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाचा असतो, अशी माहिती दिवाळे कोळीवाडा येथील हेमंत कोळी यांनी दिली.

Web Title: 'A village a Holi' in the corner; Agave spider hawlaby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी