वाशीत बस व कारचा भीषण अपघात
By Admin | Updated: May 29, 2017 06:43 IST2017-05-29T06:43:04+5:302017-05-29T06:43:04+5:30
बेस्ट बस व कार यांच्यात धडक होवून भीषण अपघाताची घटना रविवारी सकाळी घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले असून

वाशीत बस व कारचा भीषण अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बेस्ट बस व कार यांच्यात धडक होवून भीषण अपघाताची घटना रविवारी सकाळी घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले असून, एअर बॅगमुळे कार चालकाचे प्राण वाचले आहेत. मात्र अपघातानंतर बसचालक बसमधून खाली पडल्याने ताबा सुटलेली बस रस्त्यालगतच्या दवाखान्यावर धडकली.
वाशीतील अरेंजा चौकात सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बेस्ट बस (एम.एच. ०१ एल ९३५१) एपीएमसीकडून वाशीच्या दिशेने, तर कार (एमएच ०१ बीएफ ५७६२) कोपरीकडून नेरुळच्या दिशेने जात होती. यावेळी दोन्ही वाहने अरेंजा चौकात आली असता त्यांच्यात अपघात झाला. सकाळची वेळ व वाहतूक कमी असल्यामुळे दोन्ही वाहने वेगात होती. मात्र अरेंजा चौकात कार व बसच्या चालकांना दोन्ही वाहनांच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे बसच्या पुढच्या भागावर उजव्या बाजूने कार धडकली. यावेळी कारच्या जोरदार धडकेमुळे बसचा दरवाजा तुटून चालक खाली पडला. तर चालक खाली पडल्यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगतच्या रिचफिल या दवाखान्यावर धडकली. सुदैवाने यावेळी बसमध्ये कमी प्रवासी होते व दवाखाना देखील उघडलेला नव्हता यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. मात्र या अपघातामध्ये बसमधून पडल्याने चालक व बसमधील तीन प्रवासी जखमी झाले होते. त्यांच्यावर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. या दुर्घटनेमध्ये बस, कार व दवाखाना यांचे नुकसान झाले आहे. अपघातावेळी कारमध्ये एकमेव व्यक्ती होती. शिवाय कारमध्ये एअर बलून असल्यामुळे कार व बसची धडक होताच बलून उघडल्याने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. अरेंजा चौकातील याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी देखील असाच अपघात घडला होता. एनएमएमटी व टेंपोची धडक बसल्याने बस चालकाचा बसवरील ताबा सुटून बस थेट टायरच्या दुकानात घुसली होती. त्यावेळी रिचफिल या दवाखान्याच्या ऐवजी याठिकाणी टायरचे दुकान चालवले जात होते.
अरेंजा चौक हे वाशीतील पामबीच मार्गावरील रहदारीने सतत गजबजलेले ठिकाण आहे. या चौकातून एपीएमसी, वाशी दिशेने तसेच पामबीच मार्गाने सीबीडीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्याठिकाणचा चौक काढल्यापासून चालकांचे वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहिलेले नाही. सिग्नल सुरू असताना देखील अनेक जण सिग्नल तोडत असल्यामुळे असे अपघात घडत आहेत. तर रविवारी सकाळी घडलेल्या या अपघाताची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस हवालदार राजेंद्र पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी ते अधिक तपास करत आहेत.