नवी मुंबईत पाच केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:53 IST2021-01-16T00:52:49+5:302021-01-16T00:53:08+5:30
१९ हजार ८५ जणांची नोंद : आणखी ५० लसीकरण केंद्रांची तयारी

नवी मुंबईत पाच केंद्रांवर होणार लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये आज, शनिवारपासून लसीकरण सुरू होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड काळात आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी आरोग्यकर्मी कोविड योद्धयांना लसीकरण केले जाणार असून, शहरातून सुमारे १९ हजार ८५ कोविड योद्धयांची नोंद महापालिकेकडे झालेली आहे.
कोविन ॲपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला व वेळेत होणार आहे याचा संदेश मोबाईलवर प्राप्त होणार असून, प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. नवी मुंबई पालिकेस २१ हजार लस प्राप्त झालेले असून, पालिकेची वाशी व ऐरोली ही दोन सार्वजनिक रुग्णालये, तसेच नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल, तसेच खैरणे एम.आय.डी.सी. येथील रिलायन्स हॉस्पिटल अशी पाच लसीकरण आरंभ केंद्रे निश्चित आहेत. तसेच पालिका क्षेत्रात ५० लसीकरण केंद्रांची तयारी करण्यात असून, त्या ठिकाणी आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पनवेल पालिकेत तीन ठिकाणी लसीकरण
n पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शनिवारपासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
n एमजीएम, कामोठे व येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयात सकाळी
९ ते ५ दरम्यान हे लसीकरण होणार आहे. पालिकेला दोन हजार लसींचा पुरवठा झाला असल्याची माहिती उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली.
n प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचा साठा ठेवण्यात आलेला आहे. आरोग्य विभागातील ५,२३५ जणांनी पालिकेकडे नोंद केली आहे.