पॅनेल पद्धत रद्द करण्यासाठी आग्रह; महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:14 AM2019-12-11T00:14:00+5:302019-12-11T00:14:20+5:30

नवी मुंबई महापालिकेमध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत.

Urges to abolish panel method; Submission to the party's mahavikas aghadi in development | पॅनेल पद्धत रद्द करण्यासाठी आग्रह; महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठींना निवेदन

पॅनेल पद्धत रद्द करण्यासाठी आग्रह; महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठींना निवेदन

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. पॅनेल पद्धत रद्द करण्यासाठी पक्षीश्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे. पूर्वीच्याच पद्धतीने निवडणूक घ्यावी, अशी विनंती केली असून सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेमध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. १९९५ पासून पक्ष कोणताही असला तरी पालिकेवर नाईकांचेच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रसला महापालिकेच्या सत्तेमध्ये सहभागी होता आले आहे; परंतु भाजपला अद्याप दोन आकडी आकडाही गाठता आलेला नव्हता.

सद्यस्थितीमध्ये ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत व पालिकेवर सातत्याने सत्ता मिळविणारे नाईकही भाजपमध्ये असल्याने या वेळी पक्षाला यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीसाठीची पॅनेल पद्धतही भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. प्रभाग पद्धत राहिल्यास प्रत्येक प्रभागामध्ये मतदारांना एकच चिन्ह पाहून मतदान करता येणार आहे. महाविकास आघाडीचे एकाच प्रभागामध्ये तीन पक्षांचे उमेदवार असण्याची शक्यता असून, मतदारांचाही गोंधळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे ही पद्धत रद्द करावी, अशी मागणी महाआघाडीमधील तीनही पक्षांचे नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

पॅनेल पद्धतीला काँगे्रस व राष्ट्रवादीचा नेहमीच विरोध राहिला आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर आल्यानंतर ही पद्धती लागू करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही याच पद्धतीने करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत; परंतु भाजप वगळता इतर पक्षांनी यास विरोध केला आहे. काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अविनाश लाड, संतोष शेट्टी यांनीही मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.

पॅनेल पद्धत रद्द करण्यासाठीचे निवेदन त्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पॅनेल पद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी माहिती देऊन जुन्या पद्धतीनेच निवडणुका घेण्यात याव्यात असा आग्रह धरावा, अशी मागणी केली आहे. नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रभारी शशिकांत शिंदे हेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याविषयी चर्चा करणार आहेत. सरकार नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षांतराने बदलली समीकरणे

महापालिकेच्या २०१० च्या निवडुकीमध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादीने काँगे्रससोबत आघाडी करून सत्ता मिळविली; परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक व त्यांच्याकडील ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापौरांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला नाही.

शहरातील नगरसेवक व महत्त्वाच्या पदाधिकाºयांनी महापालिका निवडणूक पॅनेल पद्धतीने घेऊ नये, जुन्याच वार्ड रचनेप्रमाणे निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. पदाधिकाºयांच्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविण्यात आल्या आहेत.
- विजय नाहटा, उपनेते शिवसेना

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पॅनेल पद्धतीने घेतली जाऊ नये, अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. ही पद्धत शहराच्या हिताची नाही. आम्ही मंगळवारी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे.
- रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर, काँगे्रस

पॅनेल पद्धत रद्द करण्यात यावी. या पूर्वीच्या सरकारने त्यांच्या फायद्यासाठी ही पद्धत राज्यभर राबविली होती. नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही याचपद्धतीने घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. आम्ही पक्षश्रेष्ठींना निवेदन देऊन पॅनेल पद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे.
- अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Urges to abolish panel method; Submission to the party's mahavikas aghadi in development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.