'चेन्नई विजा २०२३' फेस्टिव्हलमध्ये उरणच्या कलाकारांचा डंका; महाराष्ट्राच्या मातीतील लावणी, कोळी नृत्याचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 17:22 IST2023-05-11T17:21:09+5:302023-05-11T17:22:14+5:30
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळी लावणी व कोळी नृत्याच्या लोककलेने चेन्नईवासियांना भारावून सोडले.

'चेन्नई विजा २०२३' फेस्टिव्हलमध्ये उरणच्या कलाकारांचा डंका; महाराष्ट्राच्या मातीतील लावणी, कोळी नृत्याचा जागर
मधुकर ठाकूर -
उरण : उरण भेंडखळ येथील कलासक्त दत्ता भोईर निर्मित " लोककला महाराष्ट्राची " हा कार्यक्रम ८ मे रोजी ' चेन्नई विजा २०२३' चेन्नईतील आयोजित फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मराठमोळी लावणी व कोळी नृत्याच्या लोककलेने चेन्नईवासियांना भारावून सोडले.
चेन्नई विजा २०२३ या फेस्टिवलमध्ये दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने महाराष्ट्राची लोककला सादर करण्यासाठी उरण भेंडखळ येथील कलासक्त संस्थेला निमंत्रित करण्यात आले होते.सांस्कृतिक समूहाच्या माध्यमातून कलासक्तचे दत्ता भोईर यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले.या फेस्टिव्हलमध्ये कलासक्तच्या कलाकारांनी महाराष्ट्राच्या लोककलेच्या वैभव असलेली पारंपारिक ठसकेबाज लावणी व कोळी आदी लोकनृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली.महाराष्ट्राच्या लोककला सादर करण्याची उरणच्या सांस्कृतिक समूहाला संधी मिळाली.या संधीचा फायदा घेत कलासक्तच्या कलाकारांनी चेन्नईत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककलेचा डंका वाजवला.
या आयोजित फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने लावणी व कोळी नृत्य दिग्दर्शन महेश कांबळे यांनी आपले कसब वापरले.तर संगीत संयोजन सुबोध कदम ,अभिजीत मोरे व प्रकाश पडवळ यांनी केले. नृत्य कलाकार म्हणून शुभम जाधव, धनेश गोंडल ,नयन ससाने, प्रतीक्षा नांदगावकर ,मेघा मुके, प्राजक्ता ठाकूर , ऋतिक पोवळे आणि चांदणी देशमुख आदींनी आपल्या नृत्य कलेची अदाकारी सादर केली.