आद्यक्रांतिकारकांच्या पुतळ्याचे अनावरण
By Admin | Updated: August 28, 2015 23:35 IST2015-08-28T23:35:34+5:302015-08-28T23:35:34+5:30
नगरपरिषदेमार्फत नाट्यगृहात बसविण्यात आलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले.

आद्यक्रांतिकारकांच्या पुतळ्याचे अनावरण
पनवेल : नगरपरिषदेमार्फत नाट्यगृहात बसविण्यात आलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले. आद्य क्रांतिकारकांच्या पणती ज्योती फडके-सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. नगरपरिषदेमार्फत आद्यक्रांतिकारक फडके नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच कास्टिंगचा पुतळा बसविण्यात आला आहे . याकरिता ३ लाख २५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र पुतळा बसवून उद्घाटना अभावी अनेक दिवस लाल कपड्यात बांधून ठेवल्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेवर नाराजी व्यक्त केली होती. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र तारखा मिळत नसल्यामुळे नगरपरिषदेमार्फत अनावरणाचा कार्यक्रम लांबविण्यात आला होता. लोकमतमध्ये याबाबत वृत्त प्रसिध्द होताच पनवेल नगरपरिषदेने याची दखल घेतली. शुक्रवारी आद्यक्रांतिकारकांच्या पणती ज्योती फडके-सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला. यावेळी बोलताना ज्योती फडके सराफ यांनी आद्यक्रांतिकारकांच्या नावाने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचा उपयोग समाजोपयोगी कार्यात होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले. उपस्थितांमध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, उपनगराध्यक्ष मदन कोळी, बांधकाम सभापती मनोहर म्हात्रे, आरोग्य सभापती गणपत म्हात्रे, नगरसेवक लतीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)