Under the Abhay Yojana, recovery of Rs 4 crore 38 lakh | महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत चार कोटी ३८ लाखांची वसुली
महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत चार कोटी ३८ लाखांची वसुली

नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत सूट देणारी अभय योजना घोषित झाल्यावर या योजनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या पहिल्या आठवड्यात ७ डिसेंबर २०१९ पर्यंत ७०८ थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला असून, ४ कोटी ३८ लाख ८४ हजार ८६२ इतकी रक्कम महापालिकेकडे जमा झाली असल्याची माहिती महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. थकित मालमत्ता करधारकांना अभय योजनेसारखी सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध होणार नसून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

अभय योजनेच्या अनुषंगाने थकित मालमत्ता करधारकांना सूट देताना नवी मुंबई शहरातील एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ता करधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये ९६९ कोटी ५६ लाख इतकी थकीत मालमत्ता कर रक्कम, तसेच १,१४३ कोटी ८१ लाख इतकी दंडात्मक रक्कम असून, एकूण २,११३.३७ कोटी इतकी रक्कम थकीत आहे. सदर रक्कम वसूल करताना नागरिकांनाही या रकमेवरील व्यजात सूट मिळावी, यासाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. नवी मुंबई शहरातील प्रत्येक थकीत मालमत्ता करधारकाला या अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे.

१ डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून ७५ टक्के माफी मिळणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम अधिक ३७.५० टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून ६२.५० टक्के माफी मिळणार आहे.

मालमत्ता कर भरताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अभय योजनेकरिता आठही विभाग कार्यालये, महापालिका मुख्यालय तसेच काही विशेष भरणा केंद्रेही सुरू करण्यात आली असून, त्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अभय योजनेला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद लाभत असून अशी सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध होणार नाही, याची जाणीव ठेवून थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर ७५ टक्केपर्यंत माफी देणाऱ्या या अभय योजनेचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Under the Abhay Yojana, recovery of Rs 4 crore 38 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.