शहरातील कंत्राटी कामगार बेमुदत संपावर

By Admin | Updated: October 25, 2016 04:20 IST2016-10-25T04:20:12+5:302016-10-25T04:20:12+5:30

कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे

Uncontrollable strike in the contract workers in the city | शहरातील कंत्राटी कामगार बेमुदत संपावर

शहरातील कंत्राटी कामगार बेमुदत संपावर

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे संतप्त कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून पाणीपुरवठा यंत्रणाही विस्कळीत झाली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कंत्राटी कामगारांनीही रणशिंग फुंकले आहे. साफसफाईच्या ठेक्यांना वाढीव मुदत न देता ते रद्द करण्यात आले आहेत. अनेक कामगारांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही वेतन देण्याविषयी काहीही कार्यवाही होत नाही. दसऱ्यामध्ये उधारी पैसे घेवून सण साजरा करावा लागला. दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे व एक वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अचानक कामगारांनी संप पुकारला आहे. साफसफाई, कचरा वाहतूक, उद्यान,मलेरिया, पाणीपुरवठा, रूग्णालय विभागातील कर्मचाऱ्यांनी काम थांबविले आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवसभर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. रस्त्यांची व उद्यानांची साफसफाई केली नाही. सकाळी पाणीही सोडले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होवू लागली. नागरिकांच्या विनंतीनंतर कामगारांनी पाणी सोडण्यास होकार दिला. पण लवकरच मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
आयुक्तांवरील अविश्वास ठरावाच्या एक दिवस अगोदर कामगारांनी आंदोलन केल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अविश्वास ठरावाला कामगारांनी आंदोलनाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. दिवसभर प्रत्येक सोसायटीमध्ये व रोडवर कचरा पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. महापालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती असल्यामुळे कामगारांशी चर्चा करण्यासाठी कोणीही जबाबदार नागरिक उपस्थित नाही. अविश्वास ठरावानंतरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Uncontrollable strike in the contract workers in the city