पनवेल : पनवेल तालुक्यातील अनधिकृत शाळा सुरूच आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळा बंद करण्याचे निर्देश संबंधित संस्था चालकांना दिले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित शाळा सुरूच ठेवल्याने हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. पालकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्यांचा अनधिकृत शाळांतून प्रवेश घेवू नये, असे जाहीर आवाहन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केले होते. विशेष म्हणजे तालुक्यातील अनधिकृत शाळांची यादीही जाहीर करण्यात आली होती. चालू शैक्षणिक वर्षात यापैकी ज्या शाळा सुरू राहतील त्यांच्यावर एक लाख रूपयांचा दंड आणि त्या पुढील प्रत्येक दिवसाला १0 हजार रूपयांच्या अतिरिक्त दंडाची शिक्षा करण्याचे जाहीर केले जाईल, असा इशारा शिक्षणाधिकारी एस.एन.बढे यांनी दिला होता. मात्र हे आदेश धाब्यावर बसवून अनधिकृत शाळा बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या शाळांवर संबंधित यंत्रणांकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पनवेलमधील अनधिकृत शाळा सुरूच
By admin | Updated: October 7, 2016 05:46 IST