"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र
By नामदेव मोरे | Updated: September 14, 2022 17:19 IST2022-09-14T17:10:02+5:302022-09-14T17:19:38+5:30
Uday Samant : "वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे."

"मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला"; उदय सामंत यांचं टीकास्त्र
नवी मुंबई - महाविकास आघाडीमुळेच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले नाही. वेदांता प्रकल्पही मागील सरकारच्या अनास्थेमुळेच गुजरातला गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. चांगले झाले की आम्ही केले व वाईट झाले की शिंदे - फडणवीस यांनी केले असे बोलण्याची वाईट सवय विरोधकांना लागली असल्याची टीकाही त्यांनी केली.
नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये बॉयलर इंडीया २०२२ प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्यावेळी उदय सामंत बोलत होते. वेदांता प्रकल्प मविआ सरकारच्या अनास्थेमुळेच इतर राज्यात गेला आहे. मागील आठ महिन्यात वेदांताचे व्यवस्थापन सरकारकडे हेलपाटे घालत होते. वीजेमध्ये सुट मिळावी, कर्नाटक, गुजरातच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हायपॉवर कमीटीची परवानगीही देण्यात आली नव्हती. यामुळे प्रकल्प इतर राज्यात गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की एखादा प्रकल्प ४० दिवसात परत जात नाही. यापुर्वीच्या सरकारच्या अनास्थेमुळेच तो प्रकल्प गेला असून भविष्यात त्यापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये जर्मनीशी संबंधीत १ हजार पेक्षा जास्त उद्योग आहेत. जर्मन शिष्टमंडळ मागील अडीच वर्ष मविआ सरकाकडे वेळ मागत होते. परंतु त्यांना चर्चेसाठी वेळ देण्यात आला नाही. त्यांच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. आम्ही त्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली असून लवकरच सविस्तर बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. मागील सरकारने महाराष्ट्र पिछाडीवर नेला होता. आता पुन्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उद्योजकांचे प्रश्न सोडविले जातील. आम्हाला भेटण्यासाठी एजंटची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार महेश बालदी, निरंजन डावखरे, रमेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.