जेएनपीएतून मुंबई ४० मिनिटांत! नवीन वर्षात दोन 'ई-स्पीड' बोटी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 06:44 IST2024-12-25T06:43:59+5:302024-12-25T06:44:26+5:30

३८ कोटींचा निधी मंजूर

Two e speed boats will run from JNPA in the new year | जेएनपीएतून मुंबई ४० मिनिटांत! नवीन वर्षात दोन 'ई-स्पीड' बोटी धावणार

जेएनपीएतून मुंबई ४० मिनिटांत! नवीन वर्षात दोन 'ई-स्पीड' बोटी धावणार

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षांत बंदरातून मुंबईत प्रवाशांसाठी अद्ययावत दोन स्पीड बोटी धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना जेएनपीएतून मुंबई ३५ ते ४० मिनिटांत गाठता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे.

जेएनपीएने या बोटींच्या ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० खर्चाच्या निधीलाही २० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. जेएनपीएने बॅटरीवरील दोन ई-स्पीड बोटी या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दोन स्पीड बोटी पुरवठा करण्याची हमी दिली आहे. त्यानुसार उन्हाळी हंगामात २० ते २५ प्रवासी क्षमता व पावसाळी हंगामात १० ते १२ प्रवासी क्षमता असलेल्या हरित सागर आणि हरित नौका या दोन वेगवान बोटी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सेवेत दाखल होणार आहेत.

लाकडी बोटींना अलविदा 

जेएनपीए बंदरातून मुंबईत येण्या जाण्यासाठी लाकडी बोटींची व्यवस्था आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी १६ फेऱ्या करीत प्रवासी वाहतूक करीत होत्या. 

यासाठी जेएनपीए दरमहा १९ लाख ६८ हजार रुपये खर्च करीत आहेत. मात्र सध्या या सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

प्रदूषणविरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये- जा करण्यासाठी स्पीड बोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षभरापूर्वीच जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणीची तयारी प्रशासनाने केली आहे. - बाळासाहेब पवार, उपसंरक्षक कॅप्टन, जेएनपीए

सध्या उरणपर्यंत रेल्वे सुरू झाली आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी अटल सेतूही खुला झाला आहे. त्यामुळे या जेएनपीए-गेटवे (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक रोडावली आहे.

Web Title: Two e speed boats will run from JNPA in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.