वडोदरा मार्गामुळे आदिवासी भूमीहीन?
By Admin | Updated: December 31, 2014 22:41 IST2014-12-31T22:41:37+5:302014-12-31T22:41:37+5:30
आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे.

वडोदरा मार्गामुळे आदिवासी भूमीहीन?
पालघर : आर्थिक विकासातील सुधारणांची गाडी वेगाने हाकण्याच्या नावावर मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्गाला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. परंतु या प्रकल्पामुळे पालघर तालुक्यातील अल्पभुधारक व आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी जाऊन ते भूमीहिन होणार असल्याने या मार्गात बदल करावा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे.
केंद्राने प्रस्तावित मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग हा पश्चिम रेल्वेच्या विरार ते गुजरात मार्गासह मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या मधल्या भागातून जाणार असून रेल्वेच्या पूर्व बाजूने सध्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर चे काम सुरू आहे. याच बाजुने बुलेट ट्रेनचा मार्गही टाकण्यात येणार आहे. दळणवळणामध्ये सुधारणा करण्याचा उद्देश ठेवून एक्स्प्रेस मार्गाचे नियोजन करण्यात येत असताना याच भागात कित्येक वर्षापासून सुरू केलेले सागरी महामार्गाचे काम मात्र संथगतीने सुरू असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रस्तावित एक्स्प्रेस मार्ग हा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळून प्रस्तावित असून या महामार्गाचे सन २०२० पर्यंत बारा पदरी विस्तारीकरण होणार असल्याने मुंबई-वडोदरा मार्ग राष्ट्रीय महामार्ग लगतच करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे सचीव प्रवीण पाटील यांनी केली. या एक्स्प्रेस मार्गाला गेल्या दोन दशकापासून वेगवेगळे प्रस्ताव पुढे आले मात्र या प्रस्तावाला शेतकऱ्यांकडून मोठा विरोध झाला होता. त्यानंतर सन २०१२ पासून या एक्स्प्रेस मार्गाकरीता सर्व्हेक्षणाचा प्रयत्न निहे येथे झाला. तो प्रयत्न शेतकऱ्यानी एकमताने हाणून पाडला.
मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस मार्ग प्रकल्पामुळे संपादीत करण्यात येणारी जमीन ही सिंचन क्षेत्राखाली सुपीक जमीन असल्याने अल्पभूधारक व आदिवासी शेतकरी भूमीहीन होणार आहेत. तसेच अनेक गावातील घरांचे विभाजन होवून शेतजमीनीही विभाजन होणार आहे. या विभाजनामुळे गावाचे जमीनीचे दोन भाग पडल्याने शेतकऱ्यांना विकासापासून वंचीत राहावे लागणार आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत्र अडवले जाऊन शेती पाण्यावाचुन बंजर होणार असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे उत्कृष्ट हवामान व प्रदूषण विरहीत असलेल्या या हरीत पट्ट्यातून वाहनांच्या वाहतुकीमुळे हवा आणि ध्वनीचे प्रदूषण वाढून त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागणार असल्याने हा एक्स्प्रेस मार्ग राष्ट्रीय महामार्गालगत जागेतून न्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी पत्रकाराद्वारे दिला आहे. (वार्ताहर)