पाण्यासाठी आदिवासींचा हल्लाबोल
By Admin | Updated: March 21, 2017 02:16 IST2017-03-21T02:16:35+5:302017-03-21T02:16:35+5:30
तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.

पाण्यासाठी आदिवासींचा हल्लाबोल
मयूर तांबडे / पनवेल
तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा सर्वांनाच बसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून आदिवासी वाड्यांना याची अधिक झळ बसत आहे.
तालुक्यातील नांदगाव येथील जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी वाडीला पाण्यावाचून वंचित राहावे लागत असल्याने त्यांनी सोमवारी पंचायत समितीवर मोर्चा काढला होता. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात असलेल्या विहिरींची पातळी खाली गेल्याने आदिवासी वाडीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यातच पनवेल तालुक्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून महिलांना, लहान मुलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. डोंगर कपाऱ्यात वसलेल्या गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. नांदगाव येथील खालची व वरची आदिवासी वाडीतील नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने ‘खायला नको पण पाणी द्या’ अशी अवस्था झाली आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या आदिवासी बांधवांना आता मजुरीबरोबरच पाण्यासाठीही भटकावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे मजुरीवरही याचा परिणाम होत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असल्याने परिसरातील पशू-पक्षीही पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत.
पाण्याची पातळी खालावल्याने परिसरातील विहिरीचे पाणी आटले आहे. तालुक्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून दुर्गम पाडे, वस्त्यांना पाणी कसे देता येईल याचे नियोजन करावे, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. नद्यांचे, ओहळाचे पाणी अडवणे, विहिरी, तलाव खोदणे, मोठ्या प्रमाणात बंधारे बांधून पाणी जिरवणे अशा स्वरूपाच्या योजना लक्षात घेऊन त्या राबवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने राज्यातील अनेक गावे व शहरांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मोरबे धरणामध्ये पुरेसा जलसाठा असल्याने नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. पण यानंतरही नागरिकांनी भविष्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासून पाणीबचत करण्यास सुरवात करावी. पाइपचा वापर करून वाहने धुवू नये. पाण्याचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. जलबचतीचे महत्त्व लक्षात घेवून नैसर्गिक जलप्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करून पाण्याविषयी कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले जावे. पाणीपुरवठ्याविषयी काहीही तक्रारी असल्यास संकेतस्थळावर व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले आहे.