Treatment of corona on a malaria patient; Death of a young man | मलेरियाच्या रुग्णावर कोरोनाचे उपचार; तरुणाचा मृत्यू

मलेरियाच्या रुग्णावर कोरोनाचे उपचार; तरुणाचा मृत्यू

उरण : मलेरियाची लागण झालेल्या तुर्भे येथील ३५ वर्षीय तरुणावर तीन दिवस कोरोनाचा उपचार करण्यात आला. त्यामुळे सदर तरूणाचा मंगळवारी मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूनंतर या तरूणाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे हा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबधितांची चौकशी करावी, अशी मागणी तरूणाच्या नातेवाईकांनी केली आहे.

मृतदेहाची अदलाबदल, डायलिसिसअभावी मुलाचा मृत्यू, मृतदेहावरील दागिन्यांची चोरी आदी प्रकारानंतर पालिकेच्या वाशी रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा समोर आला आहे. तुर्भे सेक्टर २१ येथे राहणाऱ्या एका तरूणाला मलेरियाची लागण झाली होती. त्यानुसार त्याच्यावर स्थानिक दवाखान्यात उपचार सुरू होते. परंतु ताप वाढल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्यामुळे डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्याला महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमदर्शनी कोरोनाचे लक्षणे गृहीत धरून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे रूग्णालयात दाखल केल्याच्या दुसºया दिवसापर्यंत त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवस त्याच्या प्रकृतीची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली गेली नाही. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनतर घेण्यात आलेली कोरोनाची चाचणीसुध्दा निगेटीव्ह आल्याने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याला मलेरिया झाला होता. तसे त्याच्यावर उपचारसुध्दा सुरू होते. रूग्णालयात दाखल करताना तेथील डॉक्टारांना ही बाब सांगण्यात आली होती. शिवाय त्यांना मलेरियाचे रिपोर्टसुध्दा दिले होते. वेळीच मलेरियाचे उपचार झाले असते, तर त्याचे प्राण वाचले असते.

पत्नीलाही लागण

तरूणाच्या पत्नीला बाळांतपणासाठी नेरूळच्या मीनाताई ठाकरे माता बाल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने सोमवारी मुलीला जन्म दिला. परंतु ही सुखद बातमी समजण्याआधीच पतीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. मृत्यूनंतर तरूणाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी पत्नीची चाचणी मात्र पॉझिटीव्ह आली. सुदैवाने बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पतीची चाचणी निगीटीव्ह आली असताना पत्नीची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने नातेवाईकांत संभ्रम निर्माण झाला आहे. बाळंतपणासाठी खल केलेल्या मीनाताई ठाकरे रूग्णालयातच तिला कोरानाची लागण झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. कारण घरातील इतर सदस्यांत कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. त्यामुळे चाचणी करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नकार देण्यात आला आहे.

Web Title: Treatment of corona on a malaria patient; Death of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.