दसऱ्याच्या उत्सवाला पारंपरिक साज, सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:17 IST2019-10-09T05:16:40+5:302019-10-09T05:17:00+5:30
नवरात्रोत्सवातील देवीचे घट पारंपरिक पद्धतीने सकाळी हलविण्यात आले.

दसऱ्याच्या उत्सवाला पारंपरिक साज, सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुुंबड
नवी मुंबई : विजयादशमी म्हणजे दसरा. शहरात पारंपरिक पद्धतीने दसºयाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो, त्यामुळे शहरातील सोन्याच्या पेढ्यांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. तर नवीन वाहने विशेषत: दुचाकी खरेदीसाठीही ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पारंपरिक पद्धतीने सरस्वतीपूजन, शस्त्र व पाठ्यपुस्तकांचे पूजन केल्यानंतर सोन्याचे प्रतीक म्हणून ऐकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
नवरात्रोत्सवातील देवीचे घट पारंपरिक पद्धतीने सकाळी हलविण्यात आले. घरातील देव आणि शस्त्रांची पूजा करण्यात आली. त्यानंतर मित्र व आप्तेष्टांना आपट्याची पाने देऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहरात सप्तशृंगी माता, दुर्गा माता, संतोषी माता, मरीआई मंदिरात पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढून देवीचे सीमोल्लंघन करण्यात आले. या वेळी भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नवरात्रोत्सव मंडळांनीही सायंकाळी देवीची मिरवणूक काढून उत्सवाची सांगता केली.
पनवेलमधील बाजारपेठेतही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. झेंडूची फुले, शमीपत्रांसह सोने, चांदी, वाहनखरेदीकडे नागरिकांचा मोठा कल होता.
सराफा दुकानांत गर्दी
मंगळवारी दिवसभर बाजारात ग्राहकांची रेलचेल होती. सराफांची दुकाने सांयकाळनंतर ग्राहकांनी फुलून गेली होती. वाशी सेक्टर ९ येथील बहुतांशी सराफांची दुकाने दसºयाच्या मुहूर्तावर सजली होती.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोने खरेदीवर अनेक दुकानदारांनी आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या. दसºयाच्या मुहूर्तावर अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला. तर काहींनी नवीन घराची नोंदणी केली. या मुहूर्तावर अनेकांनी आपल्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ केला.
रियल इस्टेट ठप्पच
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाला घर खरेदी करण्याचा पारंपरिक प्रघात आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून रियल इस्टेट मार्केटला मरगळ चढली आहे. याचा परिणाम यंदाही आकर्षक योजना व सवलती जाहीर करूनही ग्राहकांनी घरखरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. असे असले तरी सिडकोच्या गृहप्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी दसºयाचा मुहूर्त साधून अनेक ग्राहकांनी सिडकोच्या पोर्टलवर घरांची आॅनलाइन नोंदणी केली.
चारचाकी खरेदीकडे पाठ
देशातील आर्थिक घडामोडीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसला आहे. त्यामुळे नवीन वाहने खरेदीबाबत ग्राहकांत फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले. असे असले तरी दसºयाच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. याचा परिणाम म्हणून शहरातील दुचाकीच्या बहुतांशी शोरुम्सबाहेर सकाळपासून खरेदीदारांची गर्दी दिसून आली.
इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या खरेदीवर भर
घरे आणि वाहने आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी दसºयाच्या मुहूर्तावर घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या खरेदीला पसंती दिली. यात टीव्ही, साउंड सिस्टीम, फ्रिज वातानुकूलित यंत्र आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. विशेष म्हणजे, संबंधित विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. तसेच ठरावीक साहित्यांच्या खरेदीवर विशेष सूट देऊ केली होती. याचा परिणाम म्हणून शहरातील दुकाने आणि मॉल्समध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
पनवेल शहरात दसºयानिमित्त विविध कार्यक्रम
दसºयानिमित्त पनवेल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खारघर, कळंबोली, कामोठे आदी शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विशेषत: कळंबोलीमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पोलीस मुख्यालयात रोडपाली या ठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. पोलीस दलातील विविध शस्त्रांची या वेळी विधिवत पूजा करण्यात आली. खारघर शहरात शाश्वत फाउंडेशनच्या माध्यमातून सेक्टर १९ मधील उद्यानात शस्त्राचे विधिवत पूजनाचे कार्यक्रम आयोजक करण्यात आले होते. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा बिना गोगरी यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारत रक्षा मंचचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट रणजित कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.