एपीएमसीत नियम धाब्यावर बसवून व्यापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:51 AM2018-07-27T00:51:01+5:302018-07-27T00:51:18+5:30

भाजी मार्केटमधील प्रकार; परवाना नसलेले बनले व्यापारी

Trading by applying the rules of APMC | एपीएमसीत नियम धाब्यावर बसवून व्यापार

एपीएमसीत नियम धाब्यावर बसवून व्यापार

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवून व्यापार सुरू आहे. ‘डी’ विंगमध्ये ५०० पेक्षा जास्त व्यापारी किरकोळ विक्री करत असून, त्यामधील बहुतांश जणांकडे परवानाच नाही. परवाना नसतानाही मार्केटमध्ये बिनधास्तपणे व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी घाऊक बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट असा कागदावर उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात तेथील स्थिती अत्यंत बिकट आहे. नियम धाब्यावर बसवून कामकाज केले जात असून, त्यामध्ये भाजी मार्केटमधील किरकोळ विक्रीचाही समावेश आहे. येथील ‘डी’ विंगमधील अपवाद वगळता प्रत्येक गाळ्यात किरकोळ (सेमी होलसेलर) विक्री करणाºयांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विक्रेत्यांचा कोणताही तपशील प्रशासनाकडे उपलब्ध नाही. ५०० पेक्षा जास्त व्यापारी असल्याचा अंदाज काही कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे. नियमाप्रमाणे मार्केटच्या आवारामध्ये काम करणाºया प्रत्येकाकडे परवाना असणे आवश्यक आहे. माथाडी कामगारांपासून अडत्यांपर्यंत सर्वांना हा नियम लागू आहे; परंतु ‘डी’ विंगमध्ये व्यापार करणाºया अनेकांकडे कोणताच परवाना नाही. मार्केटमधील गाळेधारकांना नियमाप्रमाणे त्यांचे गाळे भाडेतत्त्वावर देता येत नाहीत; परंतु यानंतरही ‘डी’ विंगमध्ये किरकोळ विक्रेते व्यापार कसा करत आहेत. त्यांना गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विषयी प्रशासनाला माहिती विचारली असता, एकही गाळा अधिकृतपणे भाडेतत्त्वावर दिल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. किरकोळ विक्री करण्याची परवानगीही कोणालाच देण्यात आलेली नाही.
भाजी मार्केटमध्ये विनापरवाना व्यापार करणाºयांना नक्की कोणी अभय दिले आहे, हा विषय चर्चेचा बनला आहे. या विक्रेत्यांची कोणाकडेच अधिकृत नोंद नसल्यामुळे भविष्यात कोणी चुकीचे काम केले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. भाजी मार्केटचे कामकाज मध्यरात्री सुरू होते व दुपारी १ वाजण्यापूर्वी बहुतांश व्यवहार संपलेले असतात; पण ‘डी’ विंगमध्ये दिवसभर व्यापार सुरू असतो. दोन्ही गाळ्यांच्या मध्ये कामगार व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवरही अतिक्रमण करण्यात आले आहे. दिवसभर गाळ्यांमध्ये व्यापार सुरू असल्यामुळे येथील साफसफाईही करता येत नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्केटमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून, प्रशासन काहीही ठोस कारवाई करत नाही. वास्तविक ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे; पण प्रशासनच संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या विषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पणनमंत्र्यांसह पणन संचालकांकडे तक्रार करून नियमबाह्य काम करणाºयांवर कारवाईची मागणी केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचाही अवमान
भाजी मार्केटमधील किरकोळ व्यापाराविरोधात यापूर्वी मॅफ्को मार्केटमधील व्यापाºयांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनधिकृत किरकोळ व्यापारामुळे मॅफ्कोमधील व्यापारावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. न्यायालयानेही या व्यापारावर बंदी घातली आहे; परंतु न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून सुरू असलेल्या अनधिकृत व्यापाराविषयी प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही.

एकही परवाना दिलेला नाही
भाजी मार्केटच्या ‘डी’ विंगमध्ये इतर विंगमधील काही परवानाधारक व्यापारीही व्यवसाय करत आहेत; परंतु नियमाप्रमाणे ज्यांना जिथे गाळा दिला तेथेच व्यापार करणे आवश्यक आहे. सेमी होलसेल व किरकोळ विक्रीसाठी किती व्यापाºयांना परवाने दिले आहेत, याविषयी माहिती घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला असता, अशाप्रकारे कोणालाही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले.

बाजार समितीचा परवाना असलेल्यांनाच मार्केट आवारामध्ये प्रत्यक्ष व्यापार करता येतो. जर परवाना नसतानाही कोणी व्यापार करत असतील तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. भाजी मार्केटमध्येही कोणी विनापरवाना व्यापार करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
- अनिल चव्हाण, सचिव, बाजार समिती

Web Title: Trading by applying the rules of APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.