वाहतूककोेंडीने घेतला व्यापाऱ्याचा बळी; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:20 IST2020-12-01T00:20:20+5:302020-12-01T00:20:30+5:30
कांदा मार्केटमधील प्रकार : अपघाताची घटना कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे. रोडवर हातगाडी ठेवण्यात आल्यामुळे अर्धा रस्ता बंद झाला होता

वाहतूककोेंडीने घेतला व्यापाऱ्याचा बळी; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बसला फटका
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये शनिवारी टेम्पोने धडक दिल्यामुळे व्यापारी दिलीप जाधव यांचा मृत्यू झाला आहे. बेकायदेशीर पार्किंग, बेशिस्तपणा व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून, व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. लिलावगृहामध्ये व्यापार करणारे दिलीप जाधव हे कामानिमित्त मार्केटमध्ये गेले होते. १२ वाजण्याच्या सुमारास पुन्हा लिलावगृहाकडे जात असताना एमएच ३ सीपी ७२७१ या टेंपोने लॉरी टेंपो असोसिएशनच्या कार्यालसमोर त्यांना धडक दिली.
जाधव हे खाली कोसळल्यानंतर मागील टायर त्यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना कॅमेऱ्यात बंदिस्त झाली आहे. रोडवर हातगाडी ठेवण्यात आल्यामुळे अर्धा रस्ता बंद झाला होता. परिणामी, नाईलाजाने जाधव यांना रोडच्या मधून चालावे लागले. टेम्पो चालकाने अचानक वेग वाढविल्यामुळे त्यांना धडक बसली. मृत व्यापारी हे महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी या गावचे रहिवासी आहेत. कोपरखैरणेमध्ये वास्तव्य करत होते. मार्केटमध्ये बिगरगाळाधारक व्यापारी म्हणून काम करत होते.
कांदा-बटाटा मार्केटमध्ये मुख्य रोडवर हातगाडी, मोटारसायकल, कार, रिक्षा उभ्या केल्या जातात. नोंद नसलेल्या हातगाड्याही चालविण्यात येत आहेत. ५० पेक्षा जास्त रिक्षा दिवसभर मार्केटमध्ये उभ्या केल्या जात आहेत. प्रत्येक दुकानासमोर व मोकळ्या जागेमध्ये कार व इतर वाहनेही उभी केली जात आहेत. यामुळे मार्केटमध्ये वाहतूककोंडी होत आहे.
प्रशासनाला उशिरा जाग
कांदा मार्केटमध्ये राेडवर उभ्या राहणाऱ्या हातगाड्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. रोडवर वाहने पार्किंग करू नये, अशी मागणीही केली जात होती, परंतु प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले. अपघात झाल्यानंतर तत्काळ रोडवरील हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या कामकाजाविषयी व्यापाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.