मालकीचे धरण असूनही शहरवासी तहानलेले

By Admin | Updated: December 14, 2015 01:39 IST2015-12-14T01:39:21+5:302015-12-14T01:39:21+5:30

मोरबे धरण स्वत:च्या मालकीचे असल्यामुळे शहरात पुढील ५० वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही अशा वल्गना प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी केल्या होत्या

Townships thirsty despite the ownership of the dam | मालकीचे धरण असूनही शहरवासी तहानलेले

मालकीचे धरण असूनही शहरवासी तहानलेले

नामदेव मोरे, नवी मुंबई
मोरबे धरण स्वत:च्या मालकीचे असल्यामुळे शहरात पुढील ५० वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही अशा वल्गना प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी केल्या होत्या. परंतु पाऊस कमी पडूनही पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे डिसेंबरमध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २४ तास नाहीच पण गरजेपुरतेही पाणी मिळेनासे झाले. रविवारी अनेकांना पिण्यासाठीही पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे.
स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई देशातील एकमेव महानगरपालिका आहे. महापालिकेने २००२ मध्ये माथेरानच्या पायथ्याशी असणारे मोरबे धरण विकत घेतले. यामुळे १६५ एमसीएम एवढी क्षमता असणारे स्वत:चे धरण असल्यामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटला. परंतु पाणी मुबलक असल्यामुळे त्याचा योग्य वापर करण्याचा विसर प्रशासन व सत्ताधारी पक्षालाही पडला. चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी ३० रुपयांमध्ये ५० हजार लिटर पाणी व त्यापूर्वीच २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. यामुळे पाण्याच्या वापरावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. बांधकामासह, उद्यान व इतर वापरासाठीही पिण्याचे पाणी वापरले जावू लागले. देशात प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी दिले जावे असा निकष आहे. परंतु नवी मुंबई महापालिका २५० लिटर पाण्याचा पुरवठा करत होती. पर्यावरण अहवालाप्रमाणे पालिका मोरबे धरण व एमआयडीसीकडून रोज ४३५ एमएलडी पाणी घेते. यामधील ८२ एमएलडी पाणी गळती होत आहे. २००६ मध्ये फक्त ३६ एमएलडी पाणी गळती होत आहे.
शहरात दोन दिवसांपासून पुरेसे पाणी मिळत नाही. शनिवार व रविवारी बेलापूर, सीवूड, नेरूळ, सानपाडा, वाशी व इतर सर्व परिसरामध्ये खूपच कमी पाणी उपलब्ध झाले. सुटी असूनही अनेकांना पिण्यासाठीही पाणी मिळाले नाही. अचानक पाणी न आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ऐरोली, दिघा व एमआयडीसी परिसरात प्रत्येक गुरुवार व शुक्रवारी शटडाऊन सुरू झाला आहे. या नागरिकांना आठवड्यातून पाच दिवसच पाणी मिळत असून तेही पुरेसे मिळत नाही. महापालिकेने जुलैपासूनच योग्य नियोजन केले असते, पाणीचोरी थांबविली असती तर ही वेळ आली नसती. शहरवासीयांना चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता चार तासही पाणी मिळत नाही. चोवीस तास नको किमान गरजेपुरतेतरी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होवू लागली आहे. शहरात सुरू असलेल्या पाणीटंचाईविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून नागरिकांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
फक्त दोन तास पाणी : २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या वल्गना करणाऱ्या महापालिकेने शहरवासीयांना फक्त दोन तास पाणीपुरवठा सुरू केला आहे. सोमवार, बुधवार,शुक्रवार व शनिवारी सकाळी दोन तास पाणी दिले जात आहे. सायंकाळी पाणीपुरवठा केलाच जात नाही. मंगळवार, गुरुवार, रविवारी सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास पाणी दिले जात आहे. परंतु बदलण्यात आलेल्या वेळापत्रकाची माहितीच कोणाला देण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची दखल घेवून २००८ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय जलपुरस्कार देवून गौरविले. २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुन्हा राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार देण्यात आला.
ग्राहक समाधान व जनजागृतीसाठी २०१० मध्ये पुन्हा जलपुरस्काराने गौरविण्यात आले. याच वर्षी संकलित पावसाळी पाणी निचरा पद्धतीसाठीही पुरस्कार मिळाला.
२०११ मध्ये पुन्हा जलवितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीसाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार मिळाला. नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसेल तर या पुरस्कारांचे करायचे काय, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
मिलेनियम टॉवरमध्ये १२०० सदनिका आहेत. महापालिकेने अचानक ७० टक्के पाणीकपात केली आहे. नागरिकांना पिण्यासाठी पुरेल एवढेही पाणी मिळाले नाही. याविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला असून आम्ही याविरोधात हंडा मोर्चा काढणार आहोत. - आनंद साळसकर, अध्यक्ष सह्याद्री सोसायटी

Web Title: Townships thirsty despite the ownership of the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.