पनवेल : ‘लोकमत’च्या पनवेल कार्यालयाचा व्दितीय वर्धापन दिन गुरूवार, ६ आॅक्टोबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘सखी धमाल’ या ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शक्तिपीठ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी चार ते सात या कालावधीत हा समारंभ संपन्न होणार आहे.पनवेलमध्ये ‘लोकमत’चे वाचक मोठ्या संख्येने आहेत. त्या अनुषंगाने दोन वर्षांपूर्वी पनवेल विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. पाहता पाहता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘लोकमत’ आणि पनवेलकर या माध्यमातून अधिक जवळ आले आहेत. गुरुवारी पनवेल कार्यालयाचा व्दितीय वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘सखी धमाल’ गु्रप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १५ ग्रुप सहभागी होणार आहेत. ग्रुप डान्स स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बेलापूरच्या नृत्य कला अकादमीच्या सुहासिनी पाडळे आणि अभिनेते सोमनाथ हजारे उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, आर. बालचंदर, कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांच्या हस्ते विजेत्या पहिल्या तीन ग्रुपला पारितोषिक देवून गौरविण्यात येणार आहे. अभिनेता विघ्नेश जोशी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन देणार आहे. सखी मंचमध्ये सभासद नोंदणीकरिता पुढाकार घेणाऱ्या ४१ सखी मंच प्रतिनिधींना यावेळी सन्मानित केले जाणार आहे. रशिया येथे पार पडलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत नेत्रदीपक काम करणाऱ्या रायगडच्या ९ खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पनवेलकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आज ‘लोकमत’ पनवेल कार्यालयाचा वर्धापन दिन
By admin | Updated: October 6, 2016 03:58 IST