खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना
By नारायण जाधव | Updated: May 22, 2025 14:17 IST2025-05-22T14:17:08+5:302025-05-22T14:17:54+5:30
बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत.

खासगीकरणातून बेलापूरच्या समुद्रात येणार तीन शिपयार्ड, जहाज बांधणीसह दुरुस्ती उद्योगाला मिळेल चालना
नवी मुंबई : बेलापूरच्या समुद्रात खासगीकरणातून लवकरच तीन शिपयार्ड प्रकल्प आकार घेणार आहेत. प्रकल्प विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने विकासकांशी करारनामे केले आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबई, नवी मुंबईसह आसपासच्या परिसरातील जहाजांची देखभाल-दुरुस्ती, नवीन जहाजांची बांधणी शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार आहे. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात बंदर विभागाने ही माहिती दिली.
केंद्राच्या जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणाप्रमाणेच महाराष्ट्र शासनानेसुद्धा चार दिवसांपूर्वी आपले जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण जाहीर केले. या धोरणाचा बेलापूर येथे विकसित होणाऱ्या तिन्ही शिपयार्डना लाभ होणार आहे. यातील उद्योगांना १५ टक्के भांडवली अनुदानासह राज्य शासनाकडून कौशल्य विकास सुविधांसाठी ५ कोटींचे अर्थसाहाय्य, कर्मचारी प्रशिक्षणासाठी एक कोटीची मदत दिली जाणार आहे. राज्याच्या जहाज बांधणी धाेरणात
महाराष्ट्राने ६,६०० कोटींची गुंतवणूक आणि ४० हजार रोजगाराचे उद्दिष्ट
ठेवले आहे.
बेलापूरचे महत्त्व
बेलापूर हे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरापासून जवळ आहे. याच भागात उलवे, तरघर येथेही खासगी जेट्टी आहेत.
दोन वर्षांपूर्वी बेलापूरच्या किल्लेगावठाण परिसरात मे. ओमकार इन्फोकॉम प्रा. लिमिटेड कंपनीला नवीन जेट्टी बांधण्यास सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. ती सध्याच्या अंबुजा सिमेंट जेट्टीसमोर, रेती बंदर आणि बेलापूर किल्ल्याच्या जवळ बांधण्यात येत आहे. तिचा वापर प्रामुख्याने बोटींसाठी लागणारा कच्चा माल, साहित्याची ने-आण करण्यासाठी होणार आहे.
बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत.
नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू बेलापूरपासून जवळ आहे. मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतुकीअंतर्गत पाम बीच मार्गावरील नेरूळ जेट्टीसुद्धा बेलापूर बंदरपासूनच जवळ आहे. सिडकोचा प्रस्तावित खारघर-नेरूळ कोस्टल राेडही याच भागातून जातो.