अमरावतीच्या तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची नोंदणी भोवली
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 2, 2024 17:52 IST2024-05-02T17:51:10+5:302024-05-02T17:52:53+5:30
वाहनांची पाहणी न करताच केली नोंद.

अमरावतीच्या तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची नोंदणी भोवली
सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करून विक्री प्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे. टोळीचा सूत्रधार हा वापराच्या बहाण्याने ताब्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री करत होता.
नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणे अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्यांना भोवले आहे.
गुन्हेगारांना साथ दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील (४३), मोटर निरीक्षक गणेश वरुठे (३५), व सहायक मोटर निरीक्षक सिद्धार्थ ठोके (३५) अशी त्यांची नावे आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मोटर वाहन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाने एपीएमसी मधून चोरीचे दोन ट्रक पडकले होते. त्यांचे चेसी नंबर खोटे असून या ट्रकची बनावट कागद्पत्राद्वारे नोंदणी झाल्याचे समोर आले होते. त्याद्वारे सूत्रधार जावेद शेख (४९) याच्या मुसक्या आवळून त्याचे ५ साथीदार व त्यांना मदत करणारे अमरावती येथील ३ आरटीओ अधिकारी यांना अटक केली आहे. महंमद अस्लम शेख (४९), शिवाजी गिरी (४८), अमित सिंग (३३), शेख रफिक शेख दिलावर मन्सुरी (४०), वरून जिभेवर (४१) अशी जावेदच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेपाच कोटीचे २९ ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
जावेदचे दोन आधार कार्ड असून तो अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसी नंबर बदलून बनावट कागदपत्रे तयार करायचा. त्याच कागदपत्राद्वारे अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी त्याने एजंट व आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ट्रकची पुनर्रनोंदणी करायचा. त्यानंतर हे ट्रक मुंबई अथवा इतर ठिकाणच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना विकायचा. त्याने अमरावती आरटीओ मध्ये ६ तर नागपूरमध्ये १९ ट्रकची नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
त्याद्वारे नागपूर आरटीओमध्येही साथ देणाऱ्यांच्या शोधात पोलिस आहेत. जावेद हा रॅकेटचा सूत्रधार असून त्याच्यावर महाराष्ट्रात १० तर हरियाणात ९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. याप्रसंगी पत्रकार परिषदेस सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.