टोळधाडीने केले तीन एकर भातपीक फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:00 IST2020-11-22T23:59:49+5:302020-11-23T00:00:17+5:30
शेतकऱ्यांमध्ये चिंता : थळ्याचापाडा येथील प्रकार

टोळधाडीने केले तीन एकर भातपीक फस्त
पारोळ : भातपीक घेणारा शेतकरी शेतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आधीच संकटात असताना आता त्याच्यापुढे टोळधाडीचे नवे संकट उभे राहिले आहे. वसई तालुक्यातील थळ्याचापाडा येथील शेतकरी शांताराम जाधव यांच्या शेतातील तीन एकरमध्ये असणारे गरवे पीक टोळधाडीने फस्त केले आहे. या शेतात आता फक्त तण शिल्लक राहिले असून कृषी विभागाने शेताची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
भातपिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली असली तरी गरवे भातपीक अजूनही शेतात उभे आहे. आता या भातपिकावर टोळधाडीने आक्रमण केल्याने गरवे भातपीक धोक्यात आले आहे. यावर शेतकऱ्यांकडे उपाय नसल्याने यापासून भातपीक वाचवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हे कीटक भातरोपांतील रस शोषून घेत भाताचे कणीस निकामी करतात. त्यामुळे कणसांमध्ये दाणे न भरल्याने फक्त कणीस दिसते, पण दाणे नसतात. हे कीटक दोन ते तीन दिवसात शेत निकामी करतात. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवले आहे.
या तीन एकर जागेत दरवर्षी १०० मण भात पिकते, पण या वर्षी आलेल्या टोळधाडीमुळे आता हे पीक कापण्यायोग्यही राहिले नसून कृषी विभागाला याची माहिती दिली आहे, मात्र अजूनही दखल घेतली नाही.
- शांताराम जाधव, शेतकरी थळ्याचापाडा