बाप्पांसाठी हजारोंची फौज

By Admin | Updated: August 29, 2014 00:27 IST2014-08-29T00:27:03+5:302014-08-29T00:27:03+5:30

ठाणे शहर आणि ग्रामीण तसेच पालघर जिल्ह्यात सुमारे २ लाख ३१ हजार गणपती बाप्पांचे शुक्रवारी आगमन होणार आहे.

Thousands of army for the father | बाप्पांसाठी हजारोंची फौज

बाप्पांसाठी हजारोंची फौज

ठाणे : ठाणे शहर आणि ग्रामीण तसेच पालघर जिल्ह्यात सुमारे २ लाख ३१ हजार गणपती बाप्पांचे शुक्रवारी आगमन होणार आहे. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गणपती स्थापनेपूर्वीच्या घ्यावयाच्या दक्षतेपासून सर्व मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास बंधनकारक केले आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना लक्षात घेऊन विशेष पथक तयार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ठाणे शहर पोलीस कार्यक्षेत्रात घरगुती १ लाख ४८ हजार ८२१ तर सार्वजनिक एक हजार ४८ बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यासाठी दोन पोलीस उपायुक्त, ३ सहायक पोलीस आयुक्त, २१ पोलीस निरीक्षक, २९ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ८७९ पोलीस कर्मचारी (स्त्री-पुरुष) तसेच पाच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह ३३ पोलीस जीप, ५ दंगाविरोधी वाहने (वज्र), ३६ वायरलेस संच, ९६ वॉकीटॉकी, २ गॅस गन, २ दुर्बीण आणि ६० बॅरिकेड्स देण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात ९३७ सार्वजनिक आणि २९ हजार ५५९ घरगुती बाप्पांचे आगमन होणार असून ९९ ठिकाणी एक गाव एक गणपतीचा समावेश आहे. यासाठी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपअधीक्षक, ५१ पोलीस अधिकारी, ७३६ पोलीस कर्मचारी (पुरुष-महिला), २०५ होमगार्ड (पुरुष-महिला) आणि दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात २४२६ सार्वजनिक आणि ४८ हजार १३५ घरगुती बाप्पांचे आगमन होणार असून १७३ ठिकाणी एक गाव एक गणपतीचा समावेश आहे. यासाठी एक पोलीस अधीक्षक, एक अप्पर पोलीस अधीक्षक, ६ उपअधीक्षक, ८२ पोलीस अधिकारी, ८७५ पोलीस कर्मचारी, २९५ होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी असा बंदोबस्त राहणार आहे.
बाप्पा स्थापनेपूर्वी घ्यावयाच्या दक्षतेबाबत १२ सूचना केल्या आहेत. यात जवळील पोलीस ठाण्यामध्ये मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या माहितीपासून वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी, ज्या ठिकाणी मूर्ती बसवणार आहेत तेथे सीसीटीव्ही, विद्युतपुरवठा खंडित झाल्यास त्याची योग्य व्यवस्था तसेच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार असतील तर त्यांची माहिती देणे बंधनकारक आहे.

Web Title: Thousands of army for the father