पनवेल मतदारसंघात ‘नोटा’ला तिसरे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:43 AM2019-10-25T00:43:18+5:302019-10-25T00:43:24+5:30

पनवेलमधील पाणी, रस्ते समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजी

Third place to 'Nota' in Panvel constituency | पनवेल मतदारसंघात ‘नोटा’ला तिसरे स्थान

पनवेल मतदारसंघात ‘नोटा’ला तिसरे स्थान

googlenewsNext

- वैभव गायकर

पनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. तब्बल पाच लाख ५७ हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात तीन लाख एक हजार ७०२ मतदारांनी मतदान केले. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी मतदान, ५४.१३ टक्के पनवेलमध्ये झाल्याने कोणत्या पक्षाला किती मतदान झाले याबाबत उत्सुकता होती. मात्र, निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ‘नोटा’ला तिसरे स्थान मिळाले आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात एकूण दहा उमेदवार होते. भाजपचे प्रशांत ठाकूर विरुद्ध शेकापचे हरेश केणी यांच्यात या मतदारसंघात थेट लढत होती. आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली, तर शेकापच्या हरेश केणी यांना ८६ हजार २११ एवढी मते मिळाली. इतर आठ उमेदवारांच्या तुलनेत नोटाला पनवेलकरांनी अधिक पसंती दिल्याने तिसऱ्या क्रमांकाची मते दिली. ‘नोटा’ला १२ हजार ३७१ मते मिळाली आहेत. पनवेलमध्ये नोटा मोहीम सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. विशेषत: खारघर, कामोठे, कळंबोलीसारख्या शहरी भागात नोटाबाबत मोहीम छेडण्यात आली होती. दोन प्रमुख उमेदवारांच्या व्यतिरिक्त ‘नोटा’ची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती.

निवडणुकीला उभे असलेल्या एकही उमेदवाराला पसंती नसेल तर ‘नोटा’ हा पर्याय निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करून दिलेला आहे. पनवेलमधील १२ हजार ३७१ मतदार दहा उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल विधानसभा मतदारसंघात हरेश केणी यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार हरेश केणी यांना ८,७९२ मते मिळाली आहेत. पनवेल मतदारसंघ ‘नो सर्व्हिस, नो व्होट’ या मोहिमेनेही गाजले होते.

नवी मुंबईत ९००५ मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती

केवळ ‘नोटा’चे बटण दाबण्यासाठी १२,३७१ मतदार घराबाहेर पडले
निवडणुकीतील उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास निवडणूक आयोगाने ‘नोटा’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पनवेलमध्ये दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यापैकी एकही उमेदवार १२ हजार ३७१ मतदारांनी पसंत नसल्याने केवळ ‘नोटा’ दाबण्यासाठी १२ हजार ३७१ मतदार मतदानाच्या दिवशी घराबाहेर मतदानासाठी बाहेर पडल्याचे अंतिम निकालावरून दिसून येत आहे.
 

राजकारणात निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमुळे मतदारांचा कल ‘नोटा’कडे वाढताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणून या वेळी विधानसभा निवडणुकीत नोटाचा प्रभावी वापर झाल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून तब्बल ९,००५ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. तर शेजारच्या उरण मतदारसंघात ३,०७२ मतदारांनी नोटावर शिक्का मारला आहे. नवी मुंबईतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषत: प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न मागील २० वर्षांपासून जैसे थे आहे.

सिडको निर्मित इमारतींची पुनर्बांधणीही रखडली आहे. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आणि मागील पाच वर्षे भाजप-सेना युतीने हे प्रश्न केवळ चर्चेपुरतेच मर्यादित ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांसह सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाºया रहिवाशांत सत्ताधाऱ्यांविषयी चिड निर्माण झाली आहे.

त्याशिवाय मागील अनेक वर्षांपासून याच प्रश्नांवर नागरिकांना झुलवत ठेवणारे नेतेच या वेळीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवाय, त्यांच्यासमोर दुसरा कोणताही सक्षम पर्याय नसल्याने अनेकांनी नोटाला पसंती दिल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, आगरी-कोळी यूथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेनेही निवडणुकीच्या तोंडावर नोटा चळवळ सुरू केली होती. गावोगावी बैठका घेऊन नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. या सर्वाचा परिणाम म्हणून ऐरोली मतदारसंघातून ५,२०१ तर बेलापूरमधून ३,८०४ मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे समोर आले आहे. उरण मतदार संघातही नोटाला अधिक पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी ३,०७२ मतदारांनी नोटावर शिक्का मारला आहे.

Web Title: Third place to 'Nota' in Panvel constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.