महाराष्ट्र भवनाच्या आराखड्यात होणार बदल; विधिमंडळातील दालनात सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 08:36 IST2024-07-05T08:36:06+5:302024-07-05T08:36:18+5:30
ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पाहावयास मिळणार आहेत.

महाराष्ट्र भवनाच्या आराखड्यात होणार बदल; विधिमंडळातील दालनात सादरीकरण
नवी मुंबई - नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आले. पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये किंचित फेरबदल करून भव्य-दिव्य अशी निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करावे, असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या वास्तुची निविदा प्रक्रिया येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. या महाराष्ट्र भवनामधील प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा बसविण्यात येणार आहे. या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक (१) शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकर, अधीक्षक अभियंता अर्जुन अनोसे, वास्तुविशारद हितेन शेट्टी, अभियंत्या तेजस्विनी पंडित यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या असणार सुविधा
महाराष्ट्र भवनाची वास्तु १२ मजल्यांची असून, यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या, अतिथीगृह दुहेरी शेअरिंगच्या ७२, अतिथीगृह डबल बेडच्या
६८ तसेच एक्झिक्युटीव्ह १० अशा एकूण १६१ खाेल्या असणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिताही खोल्या असणार आहेत. त्याचबरोबर ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पाहावयास मिळणार आहेत.