खारघर शहरातील नंदिनी गोशाळेतून चार जनावरांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 01:16 IST2021-04-20T01:16:34+5:302021-04-20T01:16:39+5:30
पाच महिन्यांतील दुसरी घटना: एक गाय बेशुद्ध पडल्याने नेता न आल्याने राहिली; पोलिसात तक्रार दाखल

खारघर शहरातील नंदिनी गोशाळेतून चार जनावरांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघर शहरातील सेक्टर-१ रेल्वेस्थानकाच्या मागच्या बाजूस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचाऱ्यांना धमकावून दोन गायी व दोन बैल अशा चार गुरांना गुंगूचे औषध देऊन चोरून नेली.
टेम्पोच्या साहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुरांसह पोबारा केला .विशेष म्हणजे या घटनेत आणखी गायीला गुंगीचे औषध देऊन चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ही गाय गरोदर असल्याने गोशाळेत बेशुद्ध अवस्थेत पडल्याने तिला या चोरट्यांना घेऊन जाता आले नाही. या गायीची अवस्था गंभीर असून तिच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. यासंदर्भात गोशाळेचे मालक शैलेश खोतकर यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला लॉकडाऊन सुरू आहे. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असूनदेखील अशाप्रकारे रात्री-अपरात्री चोरीच्या घटना कशा काय होतात याबाबत शैलेश खोतकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अशीच घटना घडली होती.
त्या घटनेचादेखील कोणताच छडा लागला नसल्याचे खोतकर यांनी सांगितले.
चोरांवर
पोलिसांचा
अंकुश नाही?
खारघर शहरात वाहने, दागिने चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यानंतर थेट गायींची चोरींची घटना घडल्याने शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरांनी शहरात धुमाकूळ घातला असताना पोलिसांचे चोरट्यांवर अंकुश नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.