नवी मुंबई विमानतळाच्या स्वप्नपूर्तीचे खरे ‘हीरो’
By नारायण जाधव | Updated: October 13, 2025 10:22 IST2025-10-13T10:20:26+5:302025-10-13T10:22:23+5:30
या यशात १९९७ पासून ते आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा...

नवी मुंबई विमानतळाच्या स्वप्नपूर्तीचे खरे ‘हीरो’
नारायण जाधव, उपवृत्तसंपादक
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नवी मुंबई शहराचे नाव जगाच्या हवाई नकाशावर झळकले आहे. या यशात १९९७ पासून ते आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घ्यायलाच हवीत. मात्र, सैन्य पराक्रमी असले, तरच यश मिळते, असे म्हणतात. या सर्वांना सिडकोतील उमद्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. किंबहुना पडद्यामागचे हेच लाेक खरे ‘हीरो’ आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
नवी मुंबईच्या प्रारंभी आर. सी. सिन्हा यांनी विमानतळाची बिजे रोवली. त्यांनीच प्रथम सिटी एरोड्रोम तयार करण्याचा प्रस्ताव दिला. नंतर सहव्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सुरुवात करून जमीन खरेदी, पर्यावरणीय परवानग्यांसाठी समन्वय साधला. जी. एस. गिल यांच्या काळात २००८ मध्ये केंद्र सरकारने विमानतळास मंजुरी दिली. २०१० मध्ये तानाजी सत्रेंनी वने व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळवून मोठा अडथळाच दूर केला नाही, तर प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडाचे भरभक्कम पॅकेजही दिले.
विमानतळाने खरा वेग संजय भाटिया यांच्या काळात पकडला. भाटियांनी पुनर्वसन आणि पुनर्स्थापना धोरण तयार केले. यात त्यांना व्ही. राधा यांच्यासारख्या संवेदनशील महिला अधिकाऱ्याची साथ मिळाली. त्यांनी प्रकल्पग्रस्तांची नाराजी दूर करण्यासाठी जिवाची पर्वा न करता बाधित गावागावांत भेटी देऊन बचत गटांच्या महिलांचे मन वळविले.
यानंतर भूषण गगराणी यांच्यासारखे समाजमन जाणणारे नेतृत्व सिडकोस लाभले. विमानतळ ही पायाभूत सुविधा नाही; ते दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्याची भूमिका मांडून प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या त्यांनी मंजूर केल्या. याकामी त्यांना तेव्हाच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांनी मोलाची साथ दिली. राधा यांचे अधुरे कार्य त्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केले. गगराणी आणि लवंगारे यांच्या प्रयत्नांमुळेच १८ फेब्रुवारी २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले. यानंतर लोकेश चंद्रांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून विमानतळ वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने अडथळे दूर केले, तर संजय मुखर्जी यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून विमानतळ प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याचा कळस गाठून त्यासाठी लागणाऱ्या १,१६० हेक्टर जागेचे भूसंपादन पूर्ण केले. एवढेच नाही, तर जीव्हीकेकडून अदानी समूहाकडे हस्तांतरणाची जटिल प्रक्रियादेखील पार पाडली. नंतर अनिल डिग्गीकर यांनी विमानतळ उभारण्याचे वेळापत्रक पाळण्यावर भर देऊन सिम्युलेशन चाचणीचा टप्पा पूर्ण केला.
विजय सिंघल यांच्या नेतृत्वात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्वांत रोमांचक टप्पा गाठून ११ ऑक्टोबर २०२४ रोजी पहिले यशस्वी लँडिंग साजरे झाले, तर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी उद्घाटन झाले. सिंघल यांनीच एरोसिटी, एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्टस् सिटीची संकल्पना मांडून यशाचा कळस गाठला.
यांचेही मोलाचे योगदान
सिडकोचे पहिले नियोजनकार आर. के. झा यांच्यासह सत्येंदू सिन्हा, सोमा विजयकुमार, गीता पिल्लई, संजय चौधरी, आर. बी. धायटकर, अपर्णा वेदुला, अरविंद जाधव, जे. आर. कुलकर्णी, अरुण देशमुख, दिवाणजी पवार या अभियांत्रिकी, नियोजनकार, भूसंपादन अधिकाऱ्यांनी मोठे योगदान दिले. सर्वांच्या मेहनतीला दिवंगत बुद्धभूषण गायकवाड यांच्यासह मोहन निनावे, प्रिया रातांबे या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी देऊन सिडकोचे कार्य जगासमोर आणून मोलाची भूमिका निभावली.