‘फळांच्या राजा’चे राज्य सुरू; १,२६७ टन आंब्याची आवक : ५५ हजार पेट्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:13 IST2022-04-23T13:12:55+5:302022-04-23T13:13:17+5:30
बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही १५ एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.

‘फळांच्या राजा’चे राज्य सुरू; १,२६७ टन आंब्याची आवक : ५५ हजार पेट्यांचा समावेश
नामदेव मोरे -
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. शुक्रवारी तब्बल १२६७ टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये ५५ हजार पेट्या व २५ हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत.
बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही १५ एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक सुरू आहे. कर्नाटकमधूनही आवक वाढली आहे. हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, तोतापुरी आंबाही विक्रीसाठी येत आहे.
गेल्या आठवड्यात ५ ते ८ डझन वजनाच्या पेटीसाठी होलसेल मार्केटमध्ये २००० ते ५५०० रुपये दर मिळत होता. आता हेच दर १२०० ते ४००० वर आले आहेत. कर्नाटकचा आंबा गेल्या आठवड्यात २०० ते २२५ रुपये किलो दराने विकला जात होता. आता त्याचे दर ८० ते १२० रुपये किलो झाले आहेत. इतर आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. दर नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही आंब्याचा स्वाद घेता येणार आहे. पुढील दीड महिना आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.