नारायण जाधव
नवी मुंबई: नवी मुंबईचा भावी महापौर भाजपचाच असेल, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी माझ्या नादी लागू नका, नाही तर नुसता तुमचा टांगा पलटीच नाही तर घोडे फरार नव्हे, तर बेपत्ता करेन, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
एकनाथ शिंदेंवर एवढा राग का?
नाईक : एकनाथ शिंदेंवर कोणताही राग नाही; परंतु नगरविकासमंत्री म्हणून ते जे काही निर्णय घेत आहेत, ते शहरांचे वाटोळे करणारे आहेत. सध्या शहरात वॉटर, मीटर, गटरसह पायाभूत सुविधांचे प्रश्न प्रचाराचा मुद्दा बनले आहेत. 'यूडीसीपीआर' अर्थात एकात्मिक बांधकाम नियमावली आणून एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्र्याचे नव्हे, तर बिल्डरांचे काम केल्याचे माझे ठाम मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या 'यूडीसीपीआर'मध्ये शहर नियोजनाचा सुसंगत विचार केला होता. नागरिकांचे जीवनमान सुधारून त्यांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढेल, याचा विचार होता. मात्र, सांगकाम्या अधिकाऱ्यांनी ते ऐकलेले नाही.
घराणेशाही संपवा, नाईकांनी स्वार्थ जपला अशी टीका शिंदेसेना करीत आहे, यावर आपले मत काय?
नाईक : गणेश नाईकांनी घराणेशाही राबविली असती, स्वार्थ जपला असता तर नवी मुंबईकरांनी त्याला सतत २५ वर्षे सत्ता दिली नसती. पक्ष बदलला तरी नवी मुंबईकर माझ्यासोबत राहिले आहेत. कारण सतत २५ वर्षे मालमत्ता कर, पाणीपट्टी न वाढविणारी नवी मुंबईही एकमेव महापालिका आहे. यापुढची २५ वर्षे मी ते वाढविणार नाही, हा माझा शब्द आहे.
आपण एमआयडीसी, सिडकोचे भूखंड लाटले, असा आरोप खा. नरेश म्हस्केंनी केला आहे. त्यावर मत काय?
नाईक : ज्याला कोणाला वाटत असेल की, एमआयडीसी, सिडकोचे भूखंड लाटले, त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, पुरावे असतील तक्रारी करून कारवाई करावी. शिवाय खा. नरेश म्हस्के हे खासदार झाल्यावर ठाणे महापालिकेत का घुटमळतात, तेथील कथित गोल्डन गँगचे मेंबर कोण आहे, हे म्हस्केंनी सांगावे.
नवी मुंबईत बदल घडवू, असे शिंदेंनी म्हटले, यावर आपल्याला काय वाटते?
नाईक : एकनाथ शिंदेंना नेमका कोणता बदल हवा आहे. नवी मुंबईकरांना मुबलक पाणी मिळते, ठाण्यात पाण्याची बोंब आहे. घोडबंदर भागात ३०/३५ माळ्याच्या टॉवरलाही पाणी मिळत नाही. महापालिकेला टैंकर पुरवावे लागतात, त्यांना तसे नवी मुंबईत करायचे आहे काय. नवी मुंबई महापालिका सक्षम आहे, ठाणे महापालिकेत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला हक्काचे पैसे मिळत नाही. ते नवी मुंर्बत लगेच मिळते. तशी अवस्था नवी मुंबई महापालिकेची त्यांना करायची आहे का, नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे धरण आहे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. ठाणे महापालिका मलयुक्त सांडपाणी खाडीत सोडून पर्यावरण खराब केले आहे, त्याचे काय?
Web Summary : Ganesh Naik retorted to Eknath Shinde, criticizing his urban development decisions. He defended his family's political presence, challenged land grab allegations, and questioned Shinde's vision for Navi Mumbai, highlighting its superior civic amenities compared to Thane.
Web Summary : गणेश नाईक ने एकनाथ शिंदे को जवाब देते हुए उनके शहरी विकास निर्णयों की आलोचना की। उन्होंने अपने परिवार की राजनीतिक उपस्थिति का बचाव किया, भूमि हड़पने के आरोपों को चुनौती दी और नवी मुंबई के लिए शिंदे की दृष्टि पर सवाल उठाया, ठाणे की तुलना में इसकी बेहतर नागरिक सुविधाओं पर प्रकाश डाला।