...अन् सीबीडी पोलिस पोहोचले ‘ऑन द स्पॉट’
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 27, 2025 09:38 IST2025-07-27T09:37:58+5:302025-07-27T09:38:59+5:30
महिला थांबली असती, तर टळला असता अपघात

...अन् सीबीडी पोलिस पोहोचले ‘ऑन द स्पॉट’
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बेलापूर जेट्टीवर घडलेली कार दुर्घटना ‘लोकमत’ने प्रकाशात आणल्यानंतर दुर्घटनेपासून अनभिज्ञ सीबीडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सागरी पोलिसांकडून माहिती घेऊन संबंधित महिलेच्या शोधकार्याला सुरुवात केली. अपघातग्रस्त कारला घटनास्थळापासून काही अंतरावर सागरी पोलिस अधिकाऱ्याने थांबविण्याचाही प्रयत्न केला होता.
बेलापूर येथील ध्रुवतारा जेट्टीवरून कार खाडीत कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे १ च्या सुमारास घडली होती. या दुर्घटनेचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सीबीडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सागरी पोलिसांकडून त्यांनी घटना व महिलेची माहिती घेऊन अपघाताची नोंद करण्यासाठी महिलेला संपर्क साधण्यास सुरुवात केली. ही महिला मुंबईची राहणारी असून, बेलापूरमध्ये मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर उलवेत राहणाऱ्या मैत्रिणीकडे जात असल्याचे समजते. तिने मैत्रिणीच्या घराचे लोकेशन ‘गुगल मॅप’वर टाकले होते, असेही समजते. पाऊस आल्याने पुलाखालील मार्गावर गाडी पळविल्याचे, बचाव पथकाला तिने सांगितले. तिची गाडी जेट्टीच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना सागरी सुरक्षा पोलिस उपनिरीक्षक अलंकार म्हात्रे यांनी तिला कार थांबविण्याचाही इशारा केला.
या कारणामुळे महिला वाहू लागली
गाडीचा मागचा भाग उघडला गेल्याने त्यामधून महिला पाण्यात वाहू लागली. म्हात्रे व त्यांचे सागरी पोलिस, रेस्क्यू टीम मदतीला धावली. त्यांनी वाहत जाणाऱ्या महिलेला खाडीपात्राबाहेर काढल्यानंतर क्रेनने कारही खाडीतून बाहेर काढली. शुक्रवारी या घटनेची माहिती ‘लोकमत’ला मिळाली असता, सीबीडी पोलिसांकडे घटनेबाबत चौकशी केली होती. यामध्ये सीबीडी पोलिसांकडे घटनेची नोंद नसल्याचे समोर आले होते. अखेर शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.
महिला संपर्काबाहेर
दुर्घटनेत बचावलेल्या महिलेने सागरी पोलिसांकडे दिलेला मोबाइल नंबर बंद असल्याचे समजते. यामुळे शनिवारी पोलिसांचा तिच्याशी संपर्क झाला नाही. अखेर गाडीच्या नंबरवरून तिचा पत्ता मिळवून पोलिस तिच्याशी संपर्काच्या प्रयत्नात आहेत.